दिवाळी सण हा सर्वांसाठी महत्त्वाचा व आनंद घेऊन येणारा सणअसतो. दिवाळीमध्ये अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात, मिठाई देतात त्याचसोबत भेटवस्तू देखील देतात. त्यामुळे बऱ्याच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची चांगलीच मज्जा असते. मात्र चेन्नईमधील एका ज्वेलरी व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क कार आणि बाइक दिल्या आहेत. या ज्वेलरी शॉपच्या मालकाचे नाव जयंतीलाल आहे. चेन्नईमधील या ज्वेलरी व्यापाऱ्याची सध्या चर्चा सुरु आहे.
आपल्या कर्माचाऱ्यांना कामात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवला आहे. ही अनोखी भेटवस्तू पाहून जयंती लाल यांच्या ज्वेलरी शॉपचे कर्मचारी देखील खूप आनंदी झाले आहेत. याबद्दल जयंती लाल यांनी सांगितले की, ‘या लोकांनी मला सर्व वेळ दिला आहे. प्रत्येक चढ-उतारात ते माझ्यासोबत काम करत आहेत. हा पुरस्कार त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. जेणेकरून ते सर्व समान समर्पणाने कार्य करत राहतील.’
जयंती लाल यांनी त्यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांना कार आणि 20 कर्मचाऱ्यांना बाइक दिल्या आहेत. सध्या जयंती लाल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या अनोख्या कामाचे खूप कौतुक होत आहे.