राजापूर : राजापूर तालुक्यातील माडबन येथे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या रापण व्यवसायाला पुन्हा नव्याने सुरुवात होत असून यासाठी माडबन चेसुपुत्र असलेले ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी पुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
गेल्या ५० पेक्षा जास्त वर्षाहून अधिक काळ मच्छीमारी व्यवसायातील रापण हा प्रकार माडबन येथे बंद होता.
माडबन चे सुपुत्र असलेले आणि जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर गेल्या दोन वर्षापासून आपल्या माडबन या मूळगावी वास्तव्यास आहेत.
गेल्या दोन वर्षात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातून गावाकडे परतलेले अनेक युवक, बंद पडलेले अनेक व्यवसाय, अनेक नैसर्गिक आपत्ती यामुळे मेटाकुटीला आलेले सर्वच ग्रामस्थ ही विदारक स्थिती पाहता संघटितपणे काही तरी केले पाहिजे असा विचार मनात आल्यानंतर सांघिकपणे रापण प्रकारची मच्छीमारी आपण करू शकतो की ज्यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर उपजीविकेचे साधन मिळू शकेल हा विचार मनात आला.
त्यांनी गावातील अनेक ग्रामस्थांना बोलून दाखविला. गावातील मच्छीमारी करणारे अनेक लोक ग्रामपंचायतीच्या सरपंच व सर्व सदस्य आणि गावातील अनेक जाणकार मंडळी यांच्याशी चर्चा करण्यात आली दसऱ्याच्या मुहूर्तावर गावातील अनेक ग्रामस्थांनी युवकांनी एकत्रित येत आपण रापण प्रकारचा मच्छिमारी व्यवसाय सुरू करण्याचा एक मुखी निर्णय घेतला. गंगाराम गवाणकर यांचे अनेक मित्र मालवण भागात आहेत त्या ठिकाणी सुरू असलेल्या व्यावसायिकांकडून रापण मिळेल का याविषयी माहिती घेण्यात आली.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी पोलीस पाटील आणि मच्छीमार श्यामसुंदर गवाणकर यांना कार्याध्यक्ष करत संघटनेची ही स्थापना करण्यात आली आणि बघता बघता सुमारे दीड लाख रुपयांचा निधी संकलित झाला. देवगड तांबळडेग या परिसरातून रापण ही उपलब्ध झाली गावातील अनेक कुटुंबे या संघटनेत म्हणजेच या व्यवसायात सहभागी झाले आहेत.
देवगड येथून आणलेल्या रापणीचे श्री देवी भगवती मंदिरासमोर वाजत-गाजत आणत महिला भगिनींचा हस्ते पूजन करण्यात आले उपस्थित सर्व ग्रामस्थांनी वाजत गाजत रापण माडबन समुद्रकिनारी आणण्यात आली आणि आज या रापणचा शुभारंभ करण्यात येणार आहे हि रापण समुद्रकिनाऱ्या पर्यंत पोहोचण्यासाठी सुरू बनातून रस्ता तयार करण्याचे काम गावातील युवक आणि ग्रामस्थांनी अवघ्या दोन ते तीन तासात श्रमदानाने पूर्ण केले माडबन किनारी वादळामुळे मोठ्या प्रमाणावर सुरु वनांची पडझड झाली होती.ग्रामस्थ आणि युवकांच्या सहकार्याने या भागातील झाडे तोडत साफसफाई करण्यात आली.
सुमारे शंभर मीटर लांबीची रापण माडबन ग्रामस्थांना उपलब्ध झाली असून माजी पोलीस पाटील शामसुंदर गवाणकर यांनी सुरुवातीला आपली होडी रापण सोडण्यासाठी दिली आहे रापण टाकण्यासाठी आणि ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभाग नोंदविला आहे या व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण गावाला आर्थिक लाभ व्हावा हा प्रमुख उद्देश असून त्याबरोबरच संघटितपणे हा व्यवसाय उभारुन जिल्ह्यात आणि राज्यासमोर एक आदर्श उदाहरण निर्माण करण्याचा मनोदय ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केला आहे.