(पुणे)
कुणी काहीही मागितले नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे बुधवारी व्यक्त केली. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 22 जागांवर दावा केल्याचे वृत्त होते. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस उत्तर देत होते.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते राहुल शेवाळे यांनी लोकसभेच्या 48 पैकी 22 जागा आपल्याला मिळाव्या, असे म्हटले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजून जागावाटपाची चर्चा झाली नाही, तीनही पक्ष एकत्रित बसू आणि निर्णय घेऊ, असे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर फडणवीसांनी प्रतिकि‘या दिली. ते म्हणाले की, यावर आम्ही तीनही पक्ष एकत्रित बसू आणि जागावाटपाचा निर्णय घेऊ. अद्याप कुणी काहीही मागितले नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ.
शिवसेनेच्या दाव्यानंतर जागावाटपाचा पेच?
शिवसेनेने 48 पैकी 22 जागांवर दावा केला. त्यात ज्या ठिकाणी 13 खासदार आहेत, त्या 13 जागा भाजपा सोडण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे 48 जागांचे वाटप कसे करायचे, हा प्रश्न आहे. भाजपाने राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे.
कल्याण-ठाण्याची जागा कुणी मागितली नाही
कल्याण आणि ठाण्याची जागा अद्याप कुणीही मागितली नाही. जागावाटपाच्या चर्चेवेळी सत्तेतले तीनही पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते.