माधव कदम, सिंधुदुर्ग
गोव्यातील गोमंतक कला अकादमीचे संस्थापक- अध्यक्ष अनेक पुरस्कार प्राप्त प्रतिभावंत साहित्यिक, कवि गीतकार, ज्ञानेश्वरीचे गाढे व्यासंगी अभ्यासक निरूपणकार, प्रभावी वक्ते, अनेक विषयांचा चालता बोलता विश्वकोष असे उपादी त्यांना जाणकरांनी दिली होती. गोवाचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, कुशल प्रशासक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे भुतपूर्व उपाध्यक्ष, मराठी ही गोवा राज्याची राजभाषा व्हावी यासाठी प्रखर लढा उभारणारे मराठी भाषेचे अभिमानी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असंख्य विद्यार्थ्यांना घडविणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर पैलू पाडून त्यांना संस्कारक्षम व कर्तव्यदक्ष माणूस म्हणून घडविणारे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक-प्राचार्य गोपाळराव मयेकर यांचे वयाच्या ८७ वर्षी गुरूवारी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी भाषा आणि साहित्य विश्वाची फार मोठी हानी झाली आहे. एक चैतन्यमयी व्यासंगी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
विद्यार्थ्यांच्यावर आपुलकीच्या स्रेहभावाने अखंड प्रेम करणारे आणि कायम विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहणारे प्राचार्य मयेकर हे विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रचंड प्रिय होते. त्यांचे दु:खद निधन गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्हावे हा दुर्दैवी योग म्हणावा लागेल.
गोव्यातील मराठी भाषिकांनी गोवा राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी १९९० च्या दशकात गोव्यात फार मोठा लढा उभारला होता. प्राध्यापक मयेकर यांनी अन्य काही मराठी भाषिक नेत्यांच्याबरोबर या लढ्याचे नेतृत्व केले होते. अलिकडील काहीवर्षे अगोदर गोवा दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा न मिळाल्याबद्दल प्राचार्य मयेकर नाराजी व्यक्त करताना म्हणाले होते. गोमंतकियांच्या जीवनात मराठी भाषेचे फार मोठे स्थान आहे. त्यामुळे हा लढा लढविला गेला होता. परंतु विद्यमान राजकिय मराठी नेत्यांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा विषयच सोडून दिला आहे. गोव्यात सध्या मराठी भाषेची फार दयनिय अवस्था आहे. गोवा राज्यात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळाले नाही हे दुर्दैव आहे. गोव्यात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळाले नाही याची खंत कायम मनात ठेवून मराठी भाषेचे हे थोर उपासक, मराठी अभिमानी आता अनंतात विलीन झाले आहे हे गोव्यातील मराठी भाषिकांनी लक्षात घ्यायला हवे.
मयेकर सरांनी घडविलेले, उत्तम संस्कार केलेले त्यांचे असंख्य विद्यार्थी आज देवगड तालुक्यात तसेच अखंड महाराष्टÑ व गोवा राज्यात विविध पदावर कार्यरत आहेत. १९७४ साली देवगड येथील स.ह. केळकर महाविद्यालय सुरू झाले तिथंपासून पुढे ८ वर्षे १९८२ पर्यंत प्राचार्य मयेकर हे या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. मराठी व संस्कृत हे विषय ते शिकवायचे. वर्गातील त्यांचे शिकवणे अगर व्याख्यान ही त्यांच्या विद्यार्थ्यांना एक पर्वणीच वाटत असे. अखंड ज्ञानाचा झरा त्यांच्या मुखातून पाझरत असे. अशा शब्दात त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या आठवणी सांगतात. देवगडच्या केळकर महाविद्यालयाच्या उभारणीत व जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. तसेच देवगडच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांची कामगिरीही मोलाची आहे. १९७८-८० च्या दरम्यान झालेला लोकसभा निवडणुकीत राजापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी जनता पक्षाचे प्राध्यापक मधु दंडवते यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला.
प्राचार्य गोपाळराव मयेकर हे गोव्याचे- म्हापसा येथील निवासी! मुंबईतील परळ भागात त्यांचे बालपण गेले व शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी परळ येथे माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केली. गोवा पोर्तुगिज्यांच्या राजवटीतून मुक्त झाल्यावर ते गोव्यात गेले. त्यानंतर काहीकाळ त्यांनी म्हापसा येथील बांदेकर महाविद्यालयात तसेच धेंपो महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले. गोव्याच्या राजकारणात ते सक्रीय झाले. गोव्यातील महाराष्टÑ गोमंतक पक्षाचे ते नेते होते. म्हापसा विधानसभा मतदार संघातून १९६७ साली प्रथम आमदार म्हणून निवडुन आले. १९६७ ते १९७० याकालावधीत गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, आधुनिक गोव्याचे शिल्पकार दयानंद बांदोडकर यांच्या मंत्रीमंडळात शिक्षण, पर्यटन आदी पाच खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी गोव्याच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान दिले आहे.
मात्र, १९७० च्या दरम्यान बांदोडकर यांच्याशी मयेकर व त्यांच्या सहकाºयांचे तात्वीक मतभेद झाल्याने मंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते मंत्रीमंडळातून बाहेर पडले. गोव्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय तसेच साहित्यिक क्षेत्रात प्राचार्य मयेकर यांचे फार मोठे योगदान आहे. गोव्यातील गोमंतक कला अकादमी हे आज गोव्याचे फार मोठे भूषण मानले जाते. या कला अकादमीचे प्राचार्य मयेकर हे संस्थापक अध्यक्ष होते.
ललित लेखन, काव्य आणि गीत लेखनात तर प्रा. मयेकर यांची कामगिरी अपूर्व अशीच आहे. महाराष्ट्रातील थोर साहित्यिक पु.ल.देशपांडे, कवि नाटककार वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, मधुमंगेश कर्णिक हे थोर साहित्यिक प्रा. मयेकर यांचे खास मित्र होते. गोवा कला अकादमीच्या हिरवळीवर पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज आणि प्राध्यापक मयेकर यांची रंगलेली काव्यमैफल गोव्यातील अनेक काव्यप्रेमींच्या कायम स्मरणात आहे. ज्ञानेश्वरीचा तर त्यांचा अपूर्व असा व्यासंग होता. ज्ञानेश्वरीवर ते तासनतास विचारप्रवर्तक, चिंतनशिल अशी मंत्रमुग्ध करणारी व्याख्याने देत. ज्ञानेश्वरीचे ते उत्कृष्ठ निरूपणकार होते. त्यांनी ज्ञानेश्वरीवर भाष्य करणारे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ‘स्वप्नमेघ’ या काव्यसंग्रहाला साहित्य कला अकादमीचा उत्कृष्ठ काव्य संग्रहाचा पुरस्कार मिळाला आहे.
गोव्याच्या राजकिय व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले प्रा. मयेकर गेली काहीवर्षे राजकिय आणि सामाजिक जीवनापासून अलिप्त होते. दोनवर्षापूर्वी गोवा दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोव्यातील राजकारणावर अत्यंत तिखट शब्दात भाष्य केले होते. ते म्हणाले होते गोव्याच्या राजकारणाचा दर्जा फार घसरला आहे. नैतिकतेचा पाय ढासळत चाललेला आहे. नागरी जीवनात काही सुधारणा होत नाही. प्रशासनाला खºयाअर्थाने गती देणारे समर्थ नेतृत्व नाही. अशा भाषेत त्यांनी गोव्यातील राजकिय परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
प्रा.मयेकर यांनी गोव्याच्या भुमीवर आयुष्यभर अतोनात प्रेम केले. गोव्यातील मराठी लोकांच्या जीवनात मराठी भाषेचे अनन्य स्थान लक्षात घेता गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे होता. त्यासाठी मराठी भाषिकांनी प्रखर लढा उभारूनही तो मिळाला नाही याबद्दलची खंत त्यांनी आयुष्यभर बाळगली. गोव्यात आज मराठी भाषिक मुख्यमंत्री आहेत. गोव्याच्या राजकारणात मराठी नेते प्रमुख भुमिका बजावत आहेत. आज मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्याचा विषय त्यांच्या विस्मरणात गेला आहे अशी स्थिती आहे. गोव्याला मराठी भाषेला योग्य स्थान मिळावे यासाठी पुढाकार घेऊन मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवुन देणे हीच प्रा. गोपाळराव मयेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल !