(नवी दिल्ली)
वाराणसी ज्ञानवापी मशीद प्रकरणातून माघार घेतलेल्या याचिकाकर्त्या राखी सिंग यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. अन्य चार याचिकाकर्त्यांकडून झालेल्या छळाचे कारण देत त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. ९ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो माझा स्वतःचा असेल, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. ज्ञानवापी मशीद संकुलात हिंदू प्रार्थना आणि विधी करण्याची परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या या खटल्यातील पाच महिला याचिकाकर्त्यांपैकी राखी सिंग एक आहेत.
राखी सिंग यांचे काका जितेंद्र सिंग विसेन, जे या खटल्यातील मुख्य हिंदू याचिकाकर्त्यांपैकी एक होते. त्यांनी शनिवारी छळाचे कारण देत आपल्या कुटुंबाने या प्रकरणातून माघार घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राखी सिंग यांनी आपला झालेल्या छळाची माहिती राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातून दिली आहे.