(खेड / इक्बाल जमादार)
खेड-ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव माध्यमिक विभाग या प्रशालेतील इ. 6 वी तील सुमीत सुग्रीव मुंडे याने मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात येणार्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रौप्यपदक संपादन केले आहे. ही परीक्षा चार टप्प्यांमध्ये घेण्यात येते. त्यापैकी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होऊन पुढील प्रोजेक्ट करिता सुमीतची निवड झाली.
सुमीतने ‘वर्तमान पर्यावरण नैतिकता’ या विषयांतर्गत सर्वेक्षणात्मक प्रकल्प ‘रस्ता रुंदीकरणात होणारी वृक्षतोड : एक समस्या व त्यावर उपाययोजना’ या शीर्षकाचा प्रकल्प सादर केला होता. मुलाखत व सादरीकरणात सदर प्रकल्पाला रौप्यपदक प्राप्त होऊन त्याची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.
या विद्यार्थ्यांना रागिणी जामकर, विनोद टेंबे, रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वप्नजा मोहिते यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच सुमीतच्या पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सुमीतच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनकेले व शुभेच्छा दिल्या आहेत.