(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. महिला सक्षमीकरण चळवळी अंतर्गत आरोग्य, व्यवसाय आर्थिक साक्षरता, महिला सुरक्षा, कन्या जन्म स्वागत आदी उपक्रम राबविण्याबरोबरच राजाच्या दरबारात महिला आनंदउत्सव ही संपन्न झाला. यावेळी पाककलाकृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 25 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता राजाच्या दरबारात विविध पदार्थ सजवून ठेवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी एडवोकेट शशिकांत सुतार यांनी पुरस्कृत केलेली अनेक बक्षिसे देण्यात आली.
पाककला कृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजापूर येथील साक्षी समीर चव्हाण यांनी पटकावला त्यांनी 11 प्रकारचे वेगवेगळ्या चवीचे मोदक बनवून स्पर्धेत भाग घेतला होता. द्वितीय क्रमांक अस्मि अक्षय पंगेरकर यांनी बनविलेल्या व्हेज कटलेट या रेसिपीला मिळाला. तृतीय क्रमांक समिधा संदीप पांचाळ यांच्या नारळी वड्या या खाद्यपदार्थाला तर उत्तेजनार्थ प्रथम स्वाती परीक्षेत मांजरेकर यांच्या ब्रेड दहिवडे या पाककृतीला तर उत्तेजनार्थ द्वितीय अनुप्रिता एकनाथ पाटील यांनी बनवलेल्या मटार कचोरी या खाद्यपदार्थाला मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हॉटेल कोकण स्वाद चे जलाल काझी आणि अणसुरे येथील सौ. चारुता गाडगीळ यांनी काम पाहिले.
महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा संगीत खुर्ची आणि फनी गेम्स स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेमध्ये अस्मि अक्षय पंगेरकर यांना विजेती घोषित करण्यात आले. तर फनी गेम्स मध्ये प्रथम स्मिता साळवी, द्वितीय रीना गिरकर तर तृतीय क्रमांक शमिका गिरकर यांनी पटकावला. संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये स्वरांजली करगुटकर प्रथम, दीक्षा साखरकर द्वितीय तर पल्लवी पारकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तर या महिला आनंदोत्सवासाठी उपस्थित असलेल्या जवळपास 90% महिलांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून काही ना काही बक्षीस घेऊन जाता आले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एडवोकेट शशिकांत सुतार, माजी विधान परिषद सदस्य हुस्नबानो खलीफे, जमीर खलिफे, अनामिका जाधव, शरफुद्दीन काझी, वैभव कुवेस्कर एडवोकेट नागरेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन सौ. रेशम लाड आणि अन्य महिला सदस्यांनी केले होते. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन राजन लाड यांनी केले. तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.