(राजापूर)
राजापूर तालुक्यातील अनेक “विविध सहकारी सोसायट्यां”ची निवडणुका होत आहेत त्यापैकीच एक असलेल्या जगप्रसिद्ध जैतापुर गावच्या सोसायटीच्या निवडणुकीत तब्बल 40 उमेदवार रिंगणात असून तीन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जाणार असल्याची शक्यता आहे.
तालुक्यातील अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध गावांपैकी एक असलेल्या जैतापूर गावच्या विविध कार्यकारी सोसायटीची प्रगती होण्यापेक्षा वर्षांनुवर्षे अधोगती होत असल्याचे चित्र असताना या सोसायटीवर आपला ताबा राखण्यासाठी विद्यमान चेअरमन यांच्या पॅनलसह अन्य दोन पॅनल ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या तिन्ही पॅनल ला काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा आणि शिवसेना असे राजकीय स्वरूप आहे.
तोट्यात असल्याचे सांगितले जात असलेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत तब्बल 40 उमेदवार रिंगणात असल्याचे पाहून अधिकाऱ्यानाही आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. या खात्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने तर सर्वच पॅनलच्या प्रमुखांना आणि उमेदवारांना निवडणूक टाळून सामोपचाराने निवडणूक बिनविरोध करावी अशी सूचना वजा विनंती केल्याचे वृत्त आहे .
जर ही निवडणूक झाली तर निवडणूक वर झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने ही संस्था अवसानयानात जाण्याची आणि पुढच्या वेळी निवडणुकीला उभे राहण्यासाठी पण संस्था शिल्लक राहणार नसल्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र केवळ जिल्हा बँकेवर मत देण्याच्या अधिकाराच्या हव्यासापोटी किंवा सोसायटीच्या माध्यमातून होणारे कर्जवाटप खत विक्री यावर डोळा ठेवूनच विद्यमान संचालकच निवडणूक झाली तरी चालेल, पण आम्ही दुसऱ्या कोणाला येऊ देणार नाही अशा गमजा मारत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
विद्यमान चेअरमन आणि संचालकांनी पुढाकार घेतल्यास सामोपचाराने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते यासाठी विद्यमान संचालकांकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. मात्र केवळ स्वताचे प्राबल्य, स्वप्रतिष्ठेसाठी किंवा काही ठराविक गोष्टींवर आपला ताबा असावा या हव्यासापोटी निवडणूक लढविली गेल्यास तालुक्यात वेगवेगळ्या कारणासाठी नावाजलेल्या या गावाची सोसायटी अवसानयानात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. व असे झाल्यास त्याला पूर्णपणे विद्यमान चेअरमन, संचालक प्रामुख्याने जबाबदार असतील असेच बोलले जात आहे.
5 एप्रिल 2022 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून अजून पर्यंत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कोणाकडूनही प्रयत्न होत असल्याचे दिसत नसल्याने गावच्या सोसायटी हितापेक्षा स्वप्रतिष्ठा यालाच जास्त महत्त्व दिले जात आहे की काय, असा सवाल आता व्यक्त केला जात आहे.