(मुंबई)
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं १३ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.माणिक भिडे यांच्या निधनानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. माणिक भिडे या गेल्या काही वर्षांपासुन पार्कीन्सन्स या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारही सुरू होते. माणिक भिडे यांच्या निधनानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक लोकप्रिय गायकांचा गुरु हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
माणिक भिडे यांचा जन्म १९३५ मध्ये कोल्हापुरात जन्म झाला. लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती. त्यांना आई-वडिलांकडून संगीत शिकण्यास प्रोत्साहन मिळाले. जयपूर-अत्रौली घराण्याच्या मधुकर सडोलीकर यांच्याकडे त्यांनी प्राथमिक शास्त्रीय प्रशिक्षणाची सुरुवात केली.
गोविंद भिडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर माणिक भिडे १९६४ मध्ये मुंबईत स्थलांतरीत झाल्या. मनराव देशपांडे या त्यांच्या कौटुंबिक मित्राने या जोडप्याला गुरू मोगुबाई कुर्डीकर यांना भेटायला आणले. त्यावेळी माणिक भिडे यांनी किशोरी आमोणकर भेट घेतली. किशोरीताईंचे गाणे ऐकल्यावर माणिक भिडे त्यांच्या विद्यार्थीनी झाल्या. दिवंगत शास्त्रीय गायिका किशोतीताई आमोणकर यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले. माणिक भिडे किशोरीताईंकडून १५ वर्षे गायन शिकल्या.
माणिकताई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार होत्या. देश व विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले होते. सादरीकरणासोबत सक्षम गुरू म्हणून त्यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान होतं. संगीताची परंपरा जोपासणं हे कर्तव्य मानून माणिकताईंनी अनेक शिष्य घडवले. त्यातील अश्विनी भिडे-देशपांडे या त्यांच्या कन्या. त्याचबरोबर माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे या व अनेक शिष्यांना त्यांनी घडवलं. कलाकर, गुरू व एक व्यक्ती म्हणून माणिक भिडे यांचं सुसंपन्न असं व्यक्तिमत्व होतं.