( गणपतीपुळे / वैभव पवार )
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेमार्फत जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यव्यापी बाईक रॅली रत्नागिरीत बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काढण्यात आली. या बाईक रॅलीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांमधील कर्मचारी बंधू भगिनी सहभागी झाले होते. ही बाईक रॅली रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातून, मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली.
यावेळी या राज्यव्यापी बाईक रॅलीत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामसेवक युनियन, रत्नागिरी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, रत्नागिरी जिल्हा परिषद वाहन चालक संघटना, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना शाखा रत्नागिरी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, रत्नागिरी जिल्हा परिषद बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना इत्यादी संघटनांमधील बंधू भगिनी सहभागी झाले होते.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचे आंदोलन संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी सुरू असताना राज्यस्थान छत्तीसगड झारखंड तसेच पश्चिम बंगाल या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांना सामाजिक वार्षिक सुरक्षा प्रदान केले आहे. महाराष्ट्र राज्यातील मागील बऱ्याच वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलने सुरू आहेत. परंतु अद्याप ही महाराष्ट्र राज्याने आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही त्यामुळे शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन योजनेसाठी पुढील आयुष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने बाईक रॅलीचे आयोजन करून आपला आवाज उठविला आहे.