(जाकादेवी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेद्वारा राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी उद्या मंगळवार दि.१४ मार्च पासून पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटना पूर्ण शक्तीसह उतरणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे यांनी दिली.
राज्यातील २००५ नंतर नियुक्त कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही अत्यंत मूलभूत आणि संविधानिक मागणी आहे. या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व संघटना १४ मार्च २०२३ पासून पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये सहभागी होत आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब संघटनेतर्फे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. सदर संप यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष आणि राज्य पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
तरी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या संपामध्ये सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, जिल्हा सचिव विनोद सांगावकर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.