(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जूनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी या मागणी करीता १४ मार्च पासून कर्मचारी महासंघाने राज्य व्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरातील शासकीय कार्यालयातील कारभार ठप्प होण्याची शक्यता आहे. जुन्या पेंन्शनसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या उद्याच्या संपामध्ये सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र शासकिय, निमशासकिय, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी दि. १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. राज्यातील २००५ नंतर नियुक्त कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन योजना लागु करावी हि अत्यंत मुलभूत आणि संविधानिक मागणी आहे. यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ रत्नागिरीच्या अधिपत्याखालील १) कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना. २) कास्ट्राईब शिक्षक संघटना ३) कास्ट्राईव पाटबंधारे कर्मचारी संघटना ४) कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटना ५) कास्ट्राईब नगर परिषद कर्मचारी संघटना वगैरे सर्व खातेनिहाय संघटनांच्या ठरावानुसार दि. १४ मार्च २०२३ पासुन सुरु होणा-या संपामध्ये सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र जिल्हास्तरावर समन्वय समितीमध्ये कास्ट्राईब संघटनेला प्रतिनिधीत्व व निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. तसेच मागासवर्गिय अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रश्नासंबंधी राज्य कर्मचारी संघटना दुर्लक्ष करते. याबाबत सखेद दुःख व्यक्त करण्यात आले. मागासवर्गिय संघटना या फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर पुरोगामी चळवळ चालवतात, आणि गेली अनेक वर्षे कास्ट्राईब संघटना मागापयि अधिकारी/कर्मचारी यांचे प्रश्न शासन दरबारी सतत मांडत आहेत. संपाची नोटीस देतांना राज्य कर्मचारी संघटनेने आमच्या राज्य संघटनेशी विचार विनिमय करणे अपेक्षित आहे. परंतु गेली अनेक वर्षाचा अनुभव विचारात घेता असे घडताना दिसत नाही. असे असताना रत्नागिरी जिल्हयात समन्वय साधण्याच्या दृष्टीने संबंधित नेते मंडळीनी याकडे कानाडोळा करीत आहेत, असे मत अनेकांनी झालेल्या बैठकित मांडले.
जुनी पेंन्शन योजना इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लागू करावी याबाबत २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कास्ट्राईब संघटनेने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये आंदोलन केलेले आहे. तथापी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणी बरोबरच सरळसेवा भरतीमधील मागासवर्गियांसाठी राखीव असलेल्या पदांचा जवळपास ३,४०,००० एवढा अनुशेष व पदोन्नतीमधील १,१५,००० एवढा अनुशेष आणि मोठया प्रमाणावर रिक्त असलेली पदे तात्काळ भरावीत, तसेच वाहनचालक, परिचर, नर्सस, शिपाई, अभियंते, लिपीक अशी इतर विविध पदे कंत्राटी पध्दतीने न भरता सरळसेवा बिंदुनामावली नुसार भरण्यात यावीत. याबाबत पुढाकार घ्यावा असे सुचित करण्यात येत आहे. वरील सर्व मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हाशाखा रत्नागिरी यांचे अधिपत्याखाली सर्व खातेनिहाय संघटनांनी दि. १४ मार्च २०२३ पासून सुरु होणा-या संपामध्ये सक्रिय प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.