(नवी दिल्ली)
जी-२० चे अध्यक्षपद ही एक पक्ष किंवा व्यक्तीसाठी नाही तर भारतासाठी मिळालेला सन्मान आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी तो अभिमान आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताचे जी-२० अध्यक्षपद संपूर्ण देशासाठी आहे, जगाला आपली ताकद दाखवण्याची ही एक चांगली संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.
जी-२० परिषदेच्या तयारीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली. सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यासोबतच सीताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू, एमके स्टॅलिन, जगनमोहन रेड्डी, डी राजा, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, पीयूष गोयल, मल्लिकार्जुन खर्गे आणि एचडी देवेगौडा यांचा समावेश होता.
पुढील वर्षी २०२३ मध्ये भारतात जी २० शिखर परिषद होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सूचना मागवण्यासाठी, रणनीतींवर चर्चा करण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व राजकीय पक्षांना भारताच्या जी-२० परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले.