(संगमेश्वर)
रत्नागिरी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग ( माध्यमिक ) जि. प. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दलित सेवा संस्था, निवे बुद्रुक संचलित आश्रम शाळा व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,निवे बुद्रुक येथे आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याला संपूर्ण जिल्ह्यातील ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी संगमेश्वर तहसीलदार अमृता साबळे मॅडम म्हणाल्या की जीवन अनमोल आहे त्यामुळे जीवनाकडे टाईमपास म्हणून बघू नका.नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा,स्काऊट गाईड मेळावा ही त्याचीच सुरुवात आहे.विद्यार्थी दशेतच पुढे काय करावे हे निश्चित करा म्हणजे करिअर करणे सोपे होईल.
पोलीस अंमलदार सागर मुरुडकर यांनी मोबाईलचा जपून वापर करण्याचा सल्ला दिला व सायबर क्राईम पासून स्वतःला दूर ठेवा असे सांगितले.यावेळी वैद्यकीय अधिकारी भक्ती वाझे,सरपंच कृष्णा जोशी,अध्यक्ष चंद्रकांत यादव केंद्रप्रमुख उज्ज्वला धामणस्कर, मुख्याध्यापक संजयकुमार गुरव, अमोल जाधव,अजय वाघाटे, राहुल जोशी, वैभव यादव, श्रीकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत जिल्हा संघटक अंजली माहुरे, रमाकांत डिंगणे यांनी केले.
तीन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी चित्रकला,रांगोळी स्पर्धा व गाईड शेकोटी कार्यक्रम,दुसऱ्या दिवशी संचलन,कलर पार्टी ,शारीरिक प्रात्यक्षिके,तंबू सजावट,शोभा यात्रा,स्काऊट शेकोटी कार्यक्रम इ.स्पर्धा घेण्यात येणार आहेत.स्पर्धांचे पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल सप्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र खांबे, दिनेश नाचणकर, किशोर धुत्रे, बेबीताई पाटील, सुनिता कांबळे, राधाकृष्ण जोगदंड, नितीन पाडावे, पंडितराव ढवळे, प्रदीप कानाल, दीपक मांडवकर, तन्मय राऊत, तेजस सरमुकादम मेहनत घेत आहेत.