( चिपळूण / प्रतिनिधी )
जीवनदायिनी पाणवठे, नद्यांची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. आपल्या पूर्वजांना याची पक्की जाणीव होती. तेव्हा पिण्याचे पाणी आपल्या पासून दूर होते. आपले पूर्वज पाण्याच्या साठ्यांची काळजी घ्यायचे. नंतरच्या काळात नळसंस्कृती आली. पाणी दारात आलं आणि आपण पाणवठे, नद्या यांची स्वच्छता ठेवण्याचे विसरत गेलो. त्यामुळे आज सर्वत्र पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, स्वच्छ पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सारे समजून घेऊन आपण नदी आणि पाणवठ्यांच्या स्वछतेकडे काळजीपूर्वक पाहायला हवे, असा कानमंत्र लेखक आणि माहिती पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
चिपळूण शहरातील गोवळकोट धक्क्यावर संपन्न झालेल्या या सहभोजनासाठी शहराच्या खेन्ड केंद्रातील जिल्हा परिषद शाळा उक्ताड, जिल्हा परिषद शाळा खेन्ड मुलांची, जिल्हा परिषद शाळा गोवळकोट मराठी, जिल्हा परिषद शाळा गोवळकोट भोई या शाळा सहभागी झाल्या होत्या. उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय प्रार्थना, विविध गुणदर्शन कला सादर करून सहभोजनाचा आणि नदीच्या तीरावरील निसर्गाचा आनंद घेतला. यावेळी पुढे बोलताना, ‘दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत जाणार असून घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला अर्धा ग्लास पाणी देण्याचे आपण सुरुवात करायला हवी’ असेही वाटेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जाताना पाण्याच्या बाटलीतील शिल्लक राहिलेले पाणी आजूबाजूच्या झाडांना द्यावे. आपल्या घरात कुटुंबीयांनी पिण्यासाठी भरलेले पाणी दुसऱ्या दिवशी शिळे झाले म्हणून ओतून देणे थांबवावे, अशीही सूचना केली. यावेळी वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना नदीचा उगम, संगम, नदीच्या तीरावरील संस्कृती आदींची माहिती दिली. नदीत कचरा टाकू नये, नदीची स्वच्छता राखली जावी या हेतूने शासनाच्या सुरू असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ अभियानाचा उद्देश सांगितला. नदीच्या तीरावर सहभोजन आयोजित करुन विद्यार्थ्यांना नदीचे सान्निध्य दिल्याबद्दल वाटेकर यांनी आयोजकांना धन्यवाद दिले.
सहभोजनाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा उक्ताडचे मुख्याध्यापक आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे उपाध्यक्ष विलास महाडीक यांनी केले.
विस्तार अधिकारी सौरवी जाधव, विस्तार अधिकारी आस्मा पटेल, गोवळकोट उर्दू केंद्रप्रमुख नसरीन खडस, खेन्ड मुलांची केंद्राचे केंद्रप्रमुख आश्राजी गर्जे, सामाजिक कार्यकर्ते कैसर देसाई, विजय खापरे, संदेश पवार यांनी सहभोजनाला भेट दिली आणि उपक्रमाचे कौतुक केले. या आयोजनात खेन्ड केंद्राच्या मुख्याध्यापक संगीता गावडे, गोवळकोट मराठीचे मुख्याध्यापक मनीष भुरण, गोवळकोट भोईचे मुख्याध्यापक दिवाकर पवार तसेच शाळेतील शिक्षक सहकारी सीमा कदम, सखाराम जावीर, अंकुश राऊत, शीतल राजे, विद्या पाटणकर, प्रिया जांभळे यांनी विशेष सहकार्य केले.