राधेश लिंगायत, हर्णै
हर्णे : जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी 0 पटसंख्या असलेल्या शाळांचे काय करायचे याची चिंता शिक्षण विभागाला भेडसावत आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत सलग दिड वर्ष शाळा बंद असतानाही हर्णै मधील प्राथमिक शिक्षकांनी वेगवेगळ्या उपक्रमांमधुन पालकांची जागृती केली. परिणामी यावर्षी जि. प. शाळा हर्णै नं.१ च्या पहिलीच्या नव्या वर्गात शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या शाळेने पटसंख्येचे शतक पूर्ण करण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे.
दापोली तालुक्यातील हर्णै जि. प. शाळा क्रमांक १ मध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत. या शाळेचे मुध्याध्यापाक रूके सर, केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर राणे, उपाध्यक्ष शेखर विलणकर आणि सर्व समिती सदस्य यांनी पटसंख्या वाढीसाठी कोरोना काळातही नियोजनपूर्वक उपक्रम राबवले.
पहिले पाऊल या उपक्रमाअंतर्गत 15 एप्रिल ते 15 जून या दोन महिन्याच्या काळात पहिलीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून सेमी इंग्रजी पहीली या वर्गाची प्राथमिक तयारी ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने करुन घेण्यात आली. शिक्षकांनी अनेकवेळा विद्यार्थ्याच्या घरी जावून, पालक आणि विद्यार्थ्याच्या अडचणी दूर केल्या.
पालकांचा विश्र्वास संपादन करण्यासाठी गृहभेटी घेतल्या. त्यावेळी शाळेमधील भौतिक सुविधांची उपलब्धता, शिक्षकांद्वारे मिळणारे उत्तम शिक्षण याची माहिती पालकांना देण्यात आली. स्पोकन इंग्लिश, माय गॅलेक्सी, किलबिल अशा उपक्रमांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले. दापोलीत 2020 च्या निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले होते. कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या. या पार्श्र्वभुमीवर कोरोना के साथ भी और तुफान के बाद भी, कुछ हम कहे कुछ आप कहो हे उपक्रम राबविण्यात आले. केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार यांनी प्रत्येक पालकांशी फोनद्वारे संपर्क केला. या अभियानाला मी केंद्रप्रमुख बोलतोय असे नाव देण्यात आले होते.
या सर्व उपक्रमांमुळे पालकांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेबद्दल विश्र्वास निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत सेमी इंग्रजी अभ्यासक्रम उत्तम प्रकारे घेतला जातो. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण संवादामुळे आपल्या पाल्याकडे लक्ष दिले जाईल. याची पालकांना खात्री पटली. त्यामुळेच प्रत्यक्ष शाळा सुरु नसताना हर्णै क्रमांक 1 शाळेत पहिल्या वर्गाने पटसंख्येचे शतक पूर्ण केले.
केंद्रातील शाळांची पटसंख्या वाढली
केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार यांनी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांच्या मदतीने हे उपक्रम हर्णै केंद्रामधील सर्व शाळांमध्ये राबवले. त्यामुळे जीवन शिक्षण विद्यामंदिर हर्णै नं. 1 ची पटसंख्या 531, हर्णे उर्दू ची पटसंख्या २३० व पाजपंढरी मराठी शाळेची पटसंख्या ४२१ झाली आहे. हर्णै उर्दू केंद्रे शाळेत ४८ व पाजपंढरी मराठी शाळेत ७८ नवीन मुले दाखल झाली आहेत. इंग्रजी माध्यमातील अन्य शाळांमधून जवळपास ३० विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेने घेतली दखल
हर्णै केंद्रांने राबविलेल्या या उपक्रमांचे कौतुक करण्याकरीता आमदार योगेश जाधव, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, शिक्षण सभापती मणचेकर, शिक्षणाधिकारी निशा देवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव व मुरकुटे, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, गटशिक्षणाधिकारी बळवंतराव, शिक्षण विस्ताराधिकारी लहानगे यांनी हर्णै येथील केंद्रशाळा आणि अन्य शाळांना भेट दिली.
नागपूर आकाशवाणीवर मुलाखत
शाळेबाहेरची शाळा या कार्यक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवरुन राज्यात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येते. कोकण विभागीय समन्वयक श्रीमती ऋतुजा पाटील यांनी हर्णै केंद्रशाळने राबविलेल्या या उपक्रमांची माहिती आकाशवाणी नागपूरला दिली. त्यानंतर नागपूर आकाशवाणीने हर्णै केंद्राचे केंद्रप्रमुख ताजुद्दीन परकार, जीवन शिक्षण विद्यामंदिर हर्णै नं. १ मध्ये इयत्ता ५ वीत शिकत असलेली विद्यार्थिनी कु. सानवी सचिन मळेकर, इयत्ता पाचवीच्या वर्गशिक्षिका दर्शना कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे शेखर विलणकर व पालक सचिन मळेकर यांच्या विविध उपक्रमांत संदर्भात मुलाखत घेतल्या. या मुलाखती आकाशवाणीवरुन 19 ऑगस्टला प्रसारीत करण्यात आल्या.