(लांजा/प्रतिनिधी)
खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न यातून सुरू आहेत. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती मधील पाच टक्के निधी हा अपंगांवर खर्च झालाच पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे केले.
केंद्र शासन नियुक्त भारतीय कृत्रिम अंग अवयव निर्माण निगम कानपुर आणि जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनाचे मोफत वाटप कार्यक्रम शनिवारी ४ जून रोजी लांजा जि प शाळा क्रमांक ५ या ठिकाणी पार पडला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील ४०२ दिव्यांग आणि १४९ वयोवृद्ध अशा सहाशे लाभार्थ्यांना सव्वा कोटी रुपयांच्या कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, बाबू म्हाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष स्वरूप गुरव, शिवसेना तालुका प्रमुख संदीप दळवी, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, एलऎमको कंपनीचे डॉक्टर कृष्णा मोरया, पंचायत समिती सदस्य दिपाली दळवी, विभाग संघटक रवींद्र डोळस, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय पाटोळे, गुरुप्रसाद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले की केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे लांजा तालुक्याला सुमारे सव्वा कोटी रुपयांचे साहित्य प्राप्त झालेले आहे. आजचा हा सुवर्ण दिवस म्हणावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे केले जात आहे. गतिमंद आणि ज्येष्ठ नागरिकांचा अडचणी सुकर करण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचे ते म्हणालेे.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सहा लाभार्थ्यांना व्हीलचेअर कुबड्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.