रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत रिक्त पदांच्या भरतीमध्ये टायपिंगची शैक्षणिक अर्हता असतानाही त्याची पुर्तता न करणार्या पाच जणांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी जि. प. कडून चौकशी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात असल्याचे सांगण्यात येते.
कनिष्ठ लिपिक पदासाठी भरती करताना त्या-त्या संवर्गात नियुक्त्या दिल्या गेल्या. शासनाच्या निकषानुसार भरतीत टायपिंग, संगणकीय परिक्षा उत्तीर्ण नसल्यास पुढील दोन वर्षात त्याचे सर्टिफिकेट सादर करावयाचे असते; मात्र असे असतानाही जिल्हा परिषदेतील काही कर्मचार्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. दोन वर्षांपुर्वी हा मुद्दा प्रशासकीय ऑडीटमध्ये दिसून आला होता. याचा फटका सामान्य प्रशासन विभागातील एका सेवानिवृत्त अधिकार्याला बसला. त्यांनी न्यायालयासह कोकण आयुक्तांकडे धाव घेतली. याच प्रकारे जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचार्यांची चौकशी लावण्याचा निर्णय सामान्य प्रशासनने घेतला असल्याचे समजते. यामध्ये चौदा कर्मचारी आढळून आले. त्यातील काहींनी पदोन्नतीही घेतली होती. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत नाराजीचे सूर उमटत होते.
या विषयावर सर्वसाधारण सभेमध्येही चर्चा झाली. त्या चौदा जणांना कारवाईला सामोरे जावे लागू नये यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्याचा फायदाही झाला असून त्यांची प्रकरणे निकाली काढली आहेत. त्या चौदामधील सेवा निवृत्त झालेल्यांना पेंशनही सुरु झाली आहे. तसेच उर्वरितांना दिलासा देण्यात आला आहे. हे प्रकरण झाल्यानंतर चौकशीचे सत्र पुढे कायम आहे. आणखी पाच जणं याच पध्दतीने नियुक्त केल्याचे पुढे आले आहे.