(रत्नागिरी)
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या १७३ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसह ८३ वर्गखोल्यांसाठी ३ कोटी ९४ लाख ५६ हजार ९२१ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर निधी प्राप्तही झाला आहे. त्यामुळे वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांना नवीन वर्गखोल्या मिळतील.
याआधी शाळांच्या गरजेनुसार नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी सर्वशिक्षा अभियानातून निधी मिळत होता. मात्र, या अभियानातून बांधकामासाठी निधी देण्याचे मागील तीन वर्षांपासून बंद करण्यात आले. त्यामुळे आता नवीन वर्गखोल्या जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात येतात. वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा सुरु होता. मात्र, निधी उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे सुरु पावसाळ्यामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना गळक्या, नादूरुस्त वर्गखोल्यांमध्ये धडे गिरवावे लागत आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी ८३ नवीन वर्गखोल्यांसाठी आणि १७३ शाळांच्या दुरूस्तीसाठी ३ कोटी ९४ लाख ५६ हजार ९२१ रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झाले आहेत. या वर्गखोल्यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कामे करण्यात येणार आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेकडून प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन पुढील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना या नवीन वर्गामध्ये शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत.
दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था होत चालली आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असले तरी मोडकळीस आलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी तसेच नवीन वर्गखोल्यांसाठी शासन निधी देत नाही, ही शाळांची शोकांतिका आहे.