(रत्नागिरी)
जिल्हा परिषदेचा मार्च एण्डींग मागच्या महिन्यात संपला असल्याचे सांगितले जातेय. असे असले तरी मागील दाराने हा मार्च एण्ड सुरु असून तो अंतिम टप्प्यात आल्याचेही बोलले जात आहे. या मार्च एण्डींगच्या गडबडीत कर्मचार्यांना मात्र उपाशी रहावे लागत आहे. एप्रिल महिना संपत आला तरी अनेक विभागातील कर्मचार्यांचे पगार झाले नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेचा लांबणीवर पडलेला मार्च एण्ड शेवटच्या टप्प्यात असल्याने अर्थ व बांधकाम विभागात बीले काढण्यासाठी ठेकेदारांची मोठी धावपळ सुरू आहे. त्यातच, बीले मंजूर करण्यासाठी आता ठेकेदार स्वतः आपल्या फाईली हातात घेवून थेट अधिकार्यांच्या कक्षात जाताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सीईओंनी ठेकेदारांच्या हातातील फाईली तपासल्या, तर त्यात निश्चितच टक्केवारीचेही गणित उलगडणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर कागदावर मार्च एण्ड संपला असल्याचे दाखवण्यात आले आहे. दुसर्या बाजुला मात्र अनेक विभागाचे एप्रिल महिना संपत आला तरी पगार झालेले नाहीत. यातून वित्त विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना टक्केवारीची मोठी चर्चा सुरू होती. मात्र, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपला वचक निर्माण केला आहे. कामांच्या प्रलंबित फाईल्स, प्रशासकीय, तांत्रिक मान्यता, टेंडर प्रक्रिया, कामांची बीले इत्यादी संदर्भात त्यांनी विभाग प्रमुखांना सक्त सूचना केलेल्या आहेत. त्याचे पालनही होत आहे. मात्र काही विभागात सीईओंच्या ह्या सूचनांची पायमल्ली होताना दिसते.
सध्या झेडपीचा मार्च एण्ड सुरू आहे. त्यामुळे झालेल्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदारांची मोठी लगबग सुरू आहे. बांधकाम विभागात दररोज ठेकेदारांची गर्दी पहायला मिळते. रत्नागिरी व चिपळूण बांधकाम विभागातही गर्दी कायम दिसून येते. कामे घेताना तत्कालीन पदाधिकार्यांचे ठरलेले ‘टोल’ फाडूनही बिले निघत नसल्याने ठेकेदारांमधून आता आदळआपट होत आहे. त्यातून, ठेकेदारांनी आता स्वतःच आपल्या फायली हातात घेतल्या आहेत. हे ठेकेदार आता फायली घेवून अधिकार्यांच्या कॅबीनमध्ये जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे संबंधित फाईलमधूनच ठरलेली ’शब्दपूर्ती’ केली जात आहे. त्यामुळे बाहेर आलेल्या ठेकेदाराच्या चेहर्यावर समाधान झळकताना पहायला मिळत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत कामे घेणे आणि बीले काढण्यासाठी ’सिस्टीम’ तयार झाली आहे. अनेक विभागात ही यंत्रणा गोपनीयपणे काम करत असली तरी अर्थ व बांधकाम विभागात मात्र, कोणताही वचक राहिलेला दिसत नाही.
येथे जनतेसमोर सर्रासपणे ठेकेदारांकडून आकडेमोड केली जाते. तसेच जनतेसमोरच ठराविक ‘टक्के’ फाईलमध्ये ठेवून ती पुढे जाताना पाहून अनेकजण तोंडात बोटे घालत आहे. त्यामुळे याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.