(प्रकाश रा.पवार – संतोष रा.पवार /कळझोंडी)
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी याच स्वातंत्र्य दिनाच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक वर्षांमध्ये कळझोंडी गावात परिवर्तनाची नांदी सुरू झाली. १९४७ ला कळझोंडी गावात प्राथमिक शाळेची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने विद्या ज्ञानार्जनाचे ज्ञान मंदिर कळझोंडी गावात विद्यादेवतेच्या माध्यमातून अवतरले. सत्य शिवाहून सुंदर हे या विद्या मंदिराचा अर्थात जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नंबर १ या शाळेचा यावर्षी अमृत महोत्सवपूर्ती सोहळा आजपासून अतिशय उत्साहात संपन्न होत आहे.
७५ वर्षाच्या देदीप्यमान वाटचालीत या प्राथमिक शाळेने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. शालेय गुणवत्ता आणि भौतिक सुविधेमुळे या शाळेला जिल्हा परिषद रत्नागिरीतर्फे आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.ही बाब आम्हा ग्रामस्थांसाठी भूषणावह आहे. कळझोंडी येथील ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सुसंवादातून ही शाळा तालुक्यात नावारुपाला आली आहे.
काही कालावधीनंतर ही शाळा जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे वर्ग करण्यात आली. गावात शाळा सुरू झाल्याने गोरगरीब शेतकरी वर्गाबरोबरच गावातील सर्वच वाड्यांमधील मुलांची शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध झाली.या शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून काही मोठेपदालाही पोहोचले आहेत,काही व्यावसायिक, उद्योजक, शिक्षक, बँक ऑफिसर, अभियांत्रिकी क्षेत्र असो वा कृषी क्षेत्र या क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच अशा पदांवर स्वाभिमानाने कार्यरत आहेत. या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधांच्या पुर्ततेसाठी या गावातील शिक्षणप्रेमी व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिक, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि जिल्हा परिषदेचा अधिकारी वर्ग यांच्यात चांगल्या प्रकारचा समन्वय असल्यामुळे या शाळेची शैक्षणिक प्रगती खूपच वाखाणण्याजोगी आहे . विविध स्पर्धांमध्ये या शाळेने चमकदार कामगिरी केलेली आहे.सध्या ही शाळा दोन शिक्षकी पटसंख्येची असून आज या शाळेचा शैक्षणिक उठाव नजरेत भरणारा आहे. शिक्षणप्रेमी, दानशूर व्यक्तींबरोबरच ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी यांनी या शैक्षणिक वर्षात शाळेला उदारहस्ते आर्थिक मदत, तसेच भेट रूपाने शैक्षणिक साहित्यांची मदत दिल्यामुळे या शाळेची भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे पूर्णत्वास जाताना दिसत आहेत.
या प्राथमिक शाळेच्या वैशिष्ट्यांबाबत उल्लेख करताना असे म्हणता येते की, या शाळेतील विद्यमान मुख्याध्यापक राजकुमार जाधव आणि सहाय्यक शिक्षिका चित्रा ठाकूर मॅडम या दोन शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले जात आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी शाळेतील मुख्याध्यापक शाळेतील शिक्षिका सातत्याने पालकांच्या संपर्कात असतात. या संपर्काच्या माध्यमातून कळझोंडी शाळा नंबर एक या शाळेची शैक्षणिक प्रगती ही दिवसेंदिवस उंचावताना दिसत आहे.
शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यात सलोख्याचे संबंध असल्यामुळे आज या शाळेची भौतिक सुविधा पाहिली तर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारचे स्वच्छतागृह उभारले गेले आहे. शालेय दर्शनी भागाचे आकर्षक पध्दतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे.मुलांना शालेय पोषण आहार अतिशय चांगल्या प्रकारे दिला जातो. शाळेचे व्यवस्थापन खूपच छान असते.शाळेतील विद्यार्थी विविध सहशालेय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवून आपले व्यक्तिमत्व घडवत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत अनेक मान्यवर व्यक्ती शाळेला आवर्जून भेटी देतात.विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधतात.गरजेला मदतीचा हात पुढे करतात. विद्यार्थ्यांना व शाळेला काही दानशूर शिक्षणप्रेमी ग्रामस्थ शैक्षणिक सुविधेसाठी पुढे येतात. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी शालेय अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारच्या शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये चांगल्या प्रकारचे संपादन करत आहेत.
ग्रामीण भागातील एक आदर्श प्राथमिक शाळा म्हणून ही शाळा नावारूपाला आली आहे. या शाळेच्या स्थापनेपासून आजतागायत या शाळेला हरहुन्नरी आणि मेहनती शिक्षक लाभले.या सर्वांच्या मौलिक मार्गदर्शनामुळे व योगदानामुळे या शाळेची उत्तरोत्तर प्रगती झालेली दिसून येत आहे. अमृत महोत्सवपूर्ती सोहळा शुभारंभापासून डिसेंबर अखेरपर्यंत या शाळेच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचे मिळावे, विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प देखील या शाळेच्या माध्यमातून सोडण्यात आला आहे. या सोहळ्याचा सांगता समारंभ डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे.
शाळेचा अमृत महोत्सवपूर्ती सोहळा – २८ जानेवारी शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून दानशूर व्यक्तिमत्व, जमीन देणगीदार कै.पर्शुराम विष्णू ढापरे यांच्या नाम फलकाचे अनावरण,ढापरे कुटुंबियांचे नातू व कुटुंबीय यांचा ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार, ज्येष्ठ महिलांचा विशेष गुणगौरव आणि मान्यवरांचे मार्गदर्शन असे नियोजित कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे बहारदार विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
७५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले. अनेक विद्यार्थ्यांचे जीवन फुलवले. अनेकांना प्रगतीच्या पथावर नेले. सुजाण नागरिक निर्माण केले, देशप्रेम अंगी बाणवले, अशा या शाळेच्या अमृत महोत्सवपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण गावात आनंदाचे, चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.