(रत्नागिरी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 03 मे रोजीचा अल्टिमेटम देत मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा राज्य शासनाला इशारा दिल्यामुळे मशिदीवरील भोग्यांवरुन वाद होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात उमटू नयेत यासाठी कलम 37 (1) (3) अन्वये 29 एप्रिलपासून 01 वा. पासून ते 13 मेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
रमजान इद व अक्षय तृतीया हे दोन्ही सण एकत्र येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी मारुती मंदिर सर्कल येथे मध्यरात्री पासून करण्यात आली आहे. रात्री १२ वाजल्यापासून येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास १०-१५ पोलिस या ठिकाणी कारवाई करत होते. अनावश्यक फिरणारे वाहन चालक, गाडीची कागदपत्र नसलेले वाहन चालक तसेच पोलिसांनी थांबवूनही न थांबलेल्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत होती. एका अल्पवयीन मुलाने पोलिसांसमोर दुचाकीवरून तीन सीट नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली असता तो १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. परंतु त्याचा उद्दामपणा एवढा होता की, तो पोलिसांशी वारंवार हुज्जत घालत होता. तीन सीट असतानाही ते गाडीवरून उतरले नाही. मात्र पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच ‘सॉरी सर सोडा मला, आजचा दिवस सोडा, परत नाही वागणार’ अशी वारंवार विनवणी करू लागला.
दुसरा एक दुचाकीस्वार नाचणे रोडहून स्टँडच्या दिशेने जात असताना तो कानाला मोबाईल लावून मान वाकडी करून दुचाकी चालवत होता. पोलिसांना पाहूनही त्याने मोबाईल वरील बोलणे थांबवले नाही. दोन पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तो थांबला नाही. या घटनेवरून रोड रोमियांना पोलिसांचं भय राहिलेलं दिसत नाही.
दरम्यान रात्री पोलिसांनी अनेक वाहनधारकांवर थेट कारवाई केली. तर काहींना हेल्मेट नसणे, परवाना नसणे यावर कोणती कारवाई होऊ शकते हे समजावूनही सांगत होते. पी. आय. साळुंखे हे स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवून होते. पोलिसांच्या या कारवाईने वाहन चालकांनी मात्र धसका घेतला होता.