(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. न्यायालयीन खटल्यामुळे भरती थांबली आहे. मात्र मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी ७०० ते १००० तात्पुरते शिक्षक नेमण्यात येतील, ही भरतीही ग्राम पातळीवरच केली जाईल असा निर्णय आणि आदेश अल्पबचत सभागृहात झालेल्या मिटिंगमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला होता. रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणाही केली. जिल्ह्यातील ६२७ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यात या जिल्हा बदलीमुळे रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शिक्षक भरतीबाबत न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. मात्र त्यामुळे भरती थांबली असली तरी शिक्षण थांबता नये, यासाठी ७०० ते १००० तात्पुरते शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. इतर जिल्ह्यात अशा तात्पुरत्या शिक्षकांना पाच हजार रुपये मानधन दिले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अशा शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन दिले जाणार असल्याचे धाडसी निर्णय पालकमंत्री सामंत यांनी घेतला आहे. मात्र या शिक्षक भरती बाबत आता श्रेयवाद सूरू झाला असुन काही पक्षाचे पुढारी फुकटचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी हाच एकमेव जिल्हा आहे, जेथे पालकमंत्री उदय सामंत येथील जनतेसाठी धाडसी निर्णय घेत असुन इतर कोणी त्यांचे श्रेय लाटू नये असा सल्ला शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी दिला आहे.