(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्रीय वित्त आयोगांतर्गत 15 व्या वित्त 2022- 23 या आर्थिक वर्षांच्या अबंधित निधीचा पहिला हप्ता नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील 791 ग्रामपंचायतींसाठी 14 कोटी 88 लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामविकास विभागाकडून विकास कामांसाठी बंधित आणि अबंधित म्हणून ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10-10 टक्के निधीची तरतूद केली जाते. 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांना सन 2022-23 चा अबंधित निधी वितरीत केला जात आहे. त्यासाठी 726.41 कोटींचा निधी लागणार आहे. 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे.
सर्वाधिक 2 कोटी 56 लाखांचा निधी हा रत्नागिरी तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर सर्वात कमी निधी मंडणगडमधील 47 ग्रामपंचायतींना 65 लाख इतका प्राप्त होणार आहे. या निधीतून गावातील मूलभूत विकास कामांसाठी खर्च करता येणार आहे.
याकामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी पी.डी. यादव यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई हे सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना खर्चाबाबत मार्गदर्शन करणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात लवकरच ही रक्कम वर्ग होणार आहे.