( रत्नागिरी / प्रतिनिधी )
महावितरणकडून वारंवार विनंती, आवाहन करुनही थकबाकीदार वीज ग्राहकांकडून बील भरले जात नाही. त्यामुळे महावितरणवर अधिकचा ताण निर्माण होतो. कोरोना महामारीमध्ये महावितरण कंपनीपुढे थकबाकीचा डोंगर उभा राहिला. सध्या जिल्ह्यातील ९६ हजार ६०९ ग्राहकांनी महावितरणचे १५ कोटी २८ लाख रुपये थकवले आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक सर्वांत जास्त ८४ हजार ७८८ एवढे आहेत. वाणिज्य १० हजार ३२८ आणि औद्योगिक १ हजार ४९३ ग्राहकांचा समावेश आहे. एका महिन्याची थकबाकी असली तरी वीजजोडणी तोडण्याचे आदेश कोकण परिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १६८ थकीत ग्राहकांना महावितरणने दणका देऊन त्यांच्या वीज जोडण्या तोडल्या आहेत. मात्र, काही ग्राहक लगेच थकबाकी भरत असल्याने हा आकडा कमी, जास्त होण्याची शक्यता आहे.
महावितरण कंपनीचे वीजबिल भरण्याबाबतही सवलत देण्यात आली होती. हे बिल माफ होण्याच्या शक्यतेने अनेक ग्राहकांनी बिल भरलेच नाही. त्यामुळे महावितरणची थकबाकी प्रचंड वाढली. कंपनीची आर्थिक घडीच विस्कटून गेली. महावितरण कंपनीवर मोठे आर्थिक संकट आल्यानंतर कंपनीने थकबाकी वसुली सुरू केली. तीन महिन्याचे एकदम बिल काढल्याने ग्राहकांमध्ये संताप झाला. काही राजकीय पक्षांनी याविरुद्ध आंदोलनं केली; मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर कोरोनातील निर्बंध शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आली तरी महावितरण कंपनीची थकबाकी मात्र कमी होण्याचे नाव घेईना.
जिल्ह्यातील बिल थकलवलेले ग्राहक असे…
एकूण ग्राहक : ९६ हजार ६०९
घरगुती ग्राहक : ८४ हजार ७८८
वाणिज्य : १० हजार ३२८
औद्योगिक : १ हजार ४९३
रत्नागिरी विभाग ग्राहक व थकबाकी
घरगुती ३७२९५- ३ कोटी ९७ लाख
वाणिज्य ५५२७- २ कोटी ३ लाख
औद्योगिक ७७०- ९४ लाख
खेड विभाग ग्राहक व थकबाकी
घरगुती २५३९९- २ कोटी ६९ लाख
वाणिज्य २४८९- ८४ लाख
औद्योगिक ४१०- ८२ लाख
चिपळूण विभाग ग्राहक व थकबाकी
घरगुती २२०९४- २ कोटी ५० लाख
वाणिज्य २३१२- ९९ लाख
औद्योगिक ३१३- ५१ लाख.