(रत्नागिरी)
तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायत स्तरावर बसविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. राज्यात मंडळस्तरावर २ हजार ११९ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सध्या या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत पावसाची आक़डेवारी संकलित केली जाते. पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर ही स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत.
हवामानातील बदलाच्या नोंदी टिपण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सुमारे तीनशे ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात येणार आहेत. हवामानातील या बदलांचा कृषी विषयक अभ्यास करण्यासाठी आणि संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्याच्याच्यादृष्टीने नोंदी ठेवण्यासाठी ही स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहेत. त्याचवेळी विविध योजनांतर्गंत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळणेही अधिक सुलभ होणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात येणारी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी विविध निकषान्वये जागांची निवड करण्यात आली आहे.