(रत्नागिरी)
🟧 जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि २ नगरपंचायतींच्या हद्दीतून प्रतिदिन प्रक्रिया न करता समुद्र आणि नद्यांमध्ये २ कोटी ३९ लाख लिटर सांडपाणी सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला पर्यायाने जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कठोर कारवाईची मागणी केल्याची माहिती ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
🟧 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली सुराज्य अभियान रत्नागिरी जिल्हा समन्वयक संजय जोशी आणि सुरेश शिंदे यांनी नगर पालिकांकडून सोडण्यात येणार्या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली. त्यात ही धक्कादायक माहिती उघड झाली. जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कारवाई करण्याबाबत प्रदूषण मंडळाकडून दिरंगाई होत आहे. या प्रकरणी नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यावरच नव्हे तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही विभागीय चौकशीसह फौजदारी कारवाई होऊ शकते. प्रदूषित सांडपाण्यामुळे नदी, समुद्रातील जीवसृष्टीवर दुष्परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी मासे मृत झालेत. प्रदुषणाने मृत झालेले मासे खाल्ल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे मासे बाहेरील शहरांतही पाठवले जातात. धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
नगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करून अधिवक्ता अस्मिता सोवनी म्हणाल्या, प्रदूषण करणे हा गुन्हा असून त्यावर कारवाई न करणे हे गुन्ह्याला पाठीशी घालणे आहे. आताच कारवाई केली नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारवाई न झाल्यास पुढचे पाऊल उचलू. पत्रकार परिषदेला सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक संदेश गावडे, अधिवक्ता सोवलनी, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक विनोद गादीकर उपस्थित होते.
*दररोज सोडले जाणारे सांडपाणी (लिटर्समध्ये)*
▪️रत्नागिरी ८८ लाख
▪️राजापूर २० लाख
▪️चिपळूण ७० लाख
▪️खेड २५ लाख
▪️दापोली ३० लाख
▪️गुहागर ६ लाख
तथाकथित पर्यावरणवादी कुठे आहेत?
गणेशोत्सव आला की, तथाकथित पर्यावरणवादी मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणून ओरड करतात. जिल्ह्यात दरदिवशी कोट्यवधी लिटर पाणी समुद्रात सोडल्याने प्रदूषण होत नाही का? या विरोधात पर्यावरणवादी आवाज उठवणार का? प्रदूषित पाणी सोडणाऱ्या नगरपालिकांना स्वच्छता अभियानात क्रमांक कसा मिळतो? असा प्रश्नही त्यांनी केला.