(रत्नागिरी)
शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्ययंत्रणेला चौथ्या लाटेसाठी तयार राहा, असे पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्लॅन्टची दर आठवड्याला चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून तिसरी लाट ओसरल्यानंतरचे सर्वात जास्त २६ बाधित आज सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे; मात्र खासगी मेडिकलमध्ये मिळणारी अॅन्टिजेन कीट वापरून लक्षणे असलेले काहीजण घरातच उपचार घेत आहेत. हे भविष्यात सुपरस्प्रेडर ठरू शकतात. त्यावर आरोग्य विभागाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील ११ ऑक्सिजन प्लॅन्टची चाचणी घेण्यास आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्याची अंमलबजवाणी आरोग्य विभागाने केली आहे. काही ठिकाणी कोविड सेंटरसुद्धा सुरू केली जाणार आहेत. कालच्या आकडेवारीवरून चौथ्या लाटेचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे दिसत आहे.
आरोग्य विभागाने जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ४५८ चाचण्या केल्या. त्यामध्ये २६ जण बाधित सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ६८० झाली आहे. दिवसभरात १५ जणांनी कोरोनावर मात केली असून आजवर एकूण बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ८३ असून रुग्ण बरे होण्याचा हा टक्का ९६.९३ आहे; मात्र दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नसून एकूण मृतांची संख्या २ हजार ५३४ आहे. मृत्यूदर काहीसा कमी झाला असून, तो २.९९ एवढा आहे.