( रत्नागिरी / प्रतिनिधी )
जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 2016- 17 मध्ये शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे अध्ययन अक्षम विभाग सुरू झाला. इयत्ता 3 री ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणींचा शोध घेणे, त्यांचे शास्त्रीय मूल्यमापन करणे, निदान करणे व त्यांना प्रमाणपत्र देणे हे काम या केंद्रातर्फे केले जाते.
वाचन लेखन गणित यापैकी एक किंवा सर्व क्षेत्रात इयत्ता निरोप कार्यमान नसेल व त्यामध्ये समस्या येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना केंद्रातर्फे विविध तज्ञांमार्फत मूल्यमापन करून प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्रनंतर विविध शासकीय सवलती शाळा, महाविद्यालयीन स्तरावर देण्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले जाते. गरजेनुसार समुपदेशनही केले जाते. कोरोनाच्या आधी 2020 पूर्वी विविध तालुक्यातील 486 विद्यार्थ्यांची तपासणी या केंद्रातर्फे करण्यात आली होती . सप्टेंबर 2021 पासून आज पर्यंत एकूण 113 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यातील 41 विद्यार्थ्यांना अध्ययन अक्षमचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यामध्ये इयत्ता तिसरीपासून पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मा . मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने हे काम सुरू आहे. डॉ . गजानन पाटील प्राचार्य, डायट हे या केंद्राचे नोडल अधिकारी म्हणून काम बघतात . डायट तसेच शिक्षण विभाग , जिल्हा परिषद यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य या केंद्रास मिळते.
केंद्रामध्ये आठ तज्ञांची टीम काम करते. यामध्ये मनोविकृती तज्ञ , बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता. विशेष शिक्षक नेत्ररोगतज्ञ, कान – नाक – घसा तज्ञ यांचा समावेश आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फुले – गावडे यांच्या अविरत मार्गदर्शनाने केंद्राचे काम दिमाखदार व आदर्शवत पद्धतीने सुरू आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हे काम सुरू असले तरी रत्नागिरी जिल्ह्याच्या कामाचा ठसा ठळकपणे जाणवतो व त्याचा दर्जा निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.
नुकतेच मागील चार वर्षाच्या वाटचालीचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाचे राज्यस्तरावर भरभरून कौतुक करण्यात आले. राज्यस्तरावर अशा प्रकारचे काम करणारे हे केंद्र वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच परंतु राज्यस्तरांमध्ये अग्रेसर आहे. अधिकाधिक अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा पालक शिक्षक व व्यावसायिकांनी त्याबाबत विद्यार्थ्यांना केंद्रात आणून त्यांची तपासणी करणे , आवश्यकतेप्रमाणे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन डॉ . फुले – गावडे यांनी केले.
शाळेतील , महाविद्यालयातील शिक्षक , पालक यांच्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम , समुपदेशन कृती कार्यक्रम केंद्रातर्फे आयोजित केले जातात . मागील चार वर्षातील कामाच्या लेखाजोखा विद्यार्थ्यांबरोबरचे काम आणि गुणवत्तापूर्ण कार्य यासाठी या केंद्राचे कौतुक डॉ . गजानन पाटील व डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले.
यामध्ये केंद्राचे प्रमुख म्हणून काम करताना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाताना डॉ गावडे यांची भूमिका व मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे असेही त्यांनी सांगितले . जि.प.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे सहकार्यामुळे हे शक्य होत आहे असे डॉ . फुले – गावडे यांनी सांगितले . डॉ . नितीन चौके या विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतात.
आरोग्य व शिक्षण विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून अध्ययन अक्षम केंद्र अधिकाधिक प्रगती करेल असा विश्वास डॉ . फुले – गावडे यांनी व्यक्त केला