(रत्नागिरी)
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातील एकमेव असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांना पदोन्नतीने पालघरला बदली झाल्यावर त्यांना कार्यमुक्त कसे केले, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारणा केली. तसेच, प्रधान सचिवांपुढे हा प्रश्न मांडून तोडगा काढू, असे आश्वासनही शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांना दिले.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सद्यःस्थितीत एकही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच अस्थिरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने सामान्य माणसांची गैरसोय होत आहे. सामान्य माणसांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. रुग्णालयातील गैरसोयी आठ दिवसांत दूर झाल्या नाहीत, तर जिल्हा रुग्णालयाला टाळे ठोकू, असा इशारा आमदार साळवी यांनी दिला.
एकमेव अधिकारी असताना बदलीच्या ठिकाणी सोडलेच कसे….
जिल्हा रुग्णालय प्रशासनाशी निगडीत विषय असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावून घेतले होते. कार्यकर्त्यांतर्फे आमदार साळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली. प्रसूतीकक्षाला सध्या कोणीच वाली नाही. तिथे कार्यरत असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सांगवीकर यांची पालघरला बदली झाली. त्यांना जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कार्यमुक्त केले. त्यामुळे सध्या प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व त्यांच्या बाळांचे जीवन धोक्यात आले आहे. काहींना खासगी रुग्णालयात जावे लागते. जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ नसल्याने अडचणी निर्माण होतात. याबाबत डॉ. फुले यांनी डॉ. सांगवीकर यांची पदोन्नतीने पालघरला बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त केल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेव अधिकारी असताना बदलीच्या ठिकाणी सोडले कसे, असा प्रश्न विचारला. हे पूर्णतः चुकीचे असून, याबाबत तुम्ही माझ्याशी का बोलला नाहीत? ही गंभीर परिस्थिती मला सांगितली असती, तर वरिष्ठांशी बोलून पर्याय काढला असता. लांजा येथील भेटीवेळीही रुग्णांना खासगी डॉंक्टरांकडे पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले होते. रत्नागिरीतही तसे होत असेल तर ते चुकीचे आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, नियमित तपासणीची माहिती माझ्याकडे पाठवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत दिले आश्वासन…
जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत प्रधान सचिवांशी बोलून तत्काळ डॉ. सांगवीकर यांची स्त्रीरोग विभागात नियुक्ती करण्याविषयी किंवा पर्यायी व्यवस्थेबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी शांतपणे म्हणणे ऐकून घेतल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे, शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, अभय खेडेकर, प्रशांत सावंत, बावा चव्हाण, नितीन तळेकर, माया पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.