(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूकीत चार संघटनांच्या जोरावर स्थापन झालेल्या लोकशाही आघाडीच्या १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून लोकशाही आघाडीचे पंधराच्या पंधरा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा निर्धार पहिल्याच प्रचार सभेत करण्यात आला.
२८ मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढी येथे जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकशाही आघाडीचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.यावेळी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमिक पतपेढीच्या सभागृहात प्रचाराची पहिलीच सभा संपन्न झाली. या पहिल्याच प्रचार सभेत लोकशाही आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान धडाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केला.
विजय पाटील बोलताना म्हणाले की, पतपेढी ही सभासदांच्या हितासाठी असून या पतपेढीमध्ये सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेले गैरप्रकार उघड झाले असून त्यामुळे पतपेढीच्या हितासाठी शिक्षक लोकशाही आघाडी( टीडीएफ), रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ,रत्नागिरी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक कासट्राईब शिक्षक संघटना तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अशा चार संघटनांची मजबूत लोकशाही आघाडी तयार झाली असल्याचे सांगून या लोकशाही आघाडीला जिल्हा मुख्याध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा दिल्याचे श्री.पाटील यांनी घोषित केले. लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सर्व उमेदवार विजयी होणार आहे, माध्यमिक पतपेढीच्या विकासाच्या चाव्या लोकशाही आघाडीने हाती घेऊन या चाव्यांनी भ्रष्टाचाराची दारे बंद करा आणि पतपेढी विकासाने पुढे न्या, असे मार्गदर्शक विचार टीडीएफ संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अण्णा चावरे यांनी केले. आघाडीला आपली मते मिळणारच,पण विरोधकांची मते कशी मिळतील ? याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन सदाशिव चावरे यांनी केले.
टीडीएफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, जिल्हा माध्यमिक पतपेढीमध्ये सत्ताधारी संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळे केले असून सभासदांच्या कष्टाच्या पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आहे. आर्थिक भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे माध्यमिक पतपेढीला वाचवण्यासाठी, पतपेढीला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी, पतपेढीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकशाही आघाडीची निर्मिती झाली असून या लोकशाही आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे,असा विश्वास व्यक्त करत लोकशाही आघाडीच्या सर्व घटकांनी सदैव जागरूक राहून प्रामाणिकपणे लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी लोकशाही आघाडीचे उमेदवारांचा सहज आणि मोठ्या फरकाने विजय होण्याच्या दृष्टीने तालुकावर मेळावे,विभागवार प्रचारसभा घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी लोकशाही आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, हितचिंतक, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये टीडीएफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अण्णा चावरे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद कदम, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गोरे यांसह लोकशाही आघाडीचे सुरेश चिकणे, सुशांत कविस्कर, रोहित जाधव, रामचंद्र महाडिक, फिरोज खान तांबोळी, सचिन मिरगल, संजय चव्हाण, मंगेश जाधव, संतोष पवार, अनिल चव्हाण, प्रशांत जाधव, प्रल्हाद सरगर, लोकशाही आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार संघटनांची मजबूत लोकशाही आघाडी स्थापन होऊन सभासदांच्या हितासाठी आणि पतपेढीच्या विकासासाठी निवडणूक लढवली जात असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील सभासदांनी आनंद व्यक्त केला आहे.