(रत्नागिरी)
जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार दर्जाच्या ७८ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उशिरा काढले आहेत. बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मागील दोन वर्षात प्रथमच प्रशासकीय बदल्या करताना कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्वाथ्य लाभेल, याची खबरदारी पोलीस अधीक्षकांनी घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक, पोलिस हवालदार या दोन वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये १७ सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक, ७८ पोलिस हवालदारांचा समावेश आहे. नव्याने जिल्ह्याचा कार्यभार स्विकारलेल्या पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बदल्याचे आदेश काढताना कर्मचाऱ्यांनी सुचविलेल्या तीन ठिकाणांपैकी पहिल्या दोन क्रमांकांचा प्राधान्याने विचार केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीच्या पहिल्या दोन क्रमांकातच बदली मिळाली आहे. जिल्ह्याच्या दोन्ही भागातील कर्मचाऱ्यांना त्यांचे कुटुंब स्थायिक असलेल्या भागातच प्रामुख्याने नियुक्ती देण्यात आली आहे.