(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लोवले पड्येवाडी , ता. संगमेश्वर या शाळेच्या नवीन इमारतीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती देवरुख यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
विषयांकित शाळा इमारतीला मोठमोठया भेगा पडल्या होत्या. त्यामुळे इमारत धोकादायक झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांकडून नविन इमारतीची मागणी ग्रामपंचायत स्तरावरुन करण्यात आली त्याअनुषंगाने सन २०२२-२३ मध्ये संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये शाळा इमारती बांधकामे कार्यक्रमाअंतर्गत विषयांकित शाळेच्या तीन खोल्यांच्या नविन इमारत बांधकामास रु २५,५०,०००/- इतक्या रक्कमेच्या खर्चास मान्यता प्राप्त झाली. जिल्हापरिषद बांधकाम उपविभाग व विभागीय स्तरावरुन अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया कार्यवाही झाली. त्यानंतर सदरचे काम ठेकेदार नियुक्त करण्यात आले. कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यानंतर ठेकेदाराने काम सुरु करणेसाठी शाळेतील मुख्याध्यापक व वाडीतील ग्रा.प. सदस्य यांचेशी संपर्क साधला.
शाळेचे मुख्याध्यापक व ग्रा.प. सदस्य यांनी पडयेवाडी, दोरकडेवाडी, टेपवाडी, साळवीवाडी व गुरववाडी मधील ग्रामस्थ व ठेकेदार यांची संयुक्त बैठक आयोजित केली. बैठकीमध्ये ठेकेदाराने शाळा इमारत तीन खोल्याची मंजूर असून त्याचे बांधकामाबाबत माहिती दिली. मंजूर अंदाजपत्रकाची छायांकित प्रत ग्रामस्थांना दाखविली. शाळेचे बांधकाम जुन्या इमारतीचे ठिकाणी करावयाचे असून जुनी इमारत पाडणेच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी जुनी इमारत पाडणेसाठी मदत करावी अशी विनंती ठेकेदाराने बैठकीमध्ये केली. त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी सहमती दर्शविली व शाळे उपयोगी शैक्षणिक साहित्यांची सुरक्षित ठिकाणी वहातुक करणे, जुनी इमारत कोसळणे, कोसळलेले साहित्य वेगवेगळे ठेवणे इत्यादी कामासाठी ग्रामस्थांनी मदत केली. बैठकीमध्ये शाळा इमारतीचे बांधकाम करणेपूर्वी संबंधित खात्याचे अधिकारी यांचे समवेत बैठक आयोजित करुन शाळेचा आराखडा ग्रामस्थांना समजावून द्यावा असे ग्रामस्थांनी म्हणणे मांडले.
अधिकाऱ्यांना वेळ नसतो असे सांगुन या बाबीकडे ठेकेदाराने जाणुनबुजुन दुर्लक्ष केले. शाळा इमारतीचा नकाशा दाखवा अशी काही ग्रामस्थांनी मागणी केली. त्यावर ठेकेदाराने माझ्याकडे फक्त अंदाजपत्रक आहे, त्याचा नकाशा नाही , असे उत्तर दिले व अंदाजपत्रकाच्या मागे कोऱ्या पानावर हाताने नकाशा काढून दाखविला. याच बैठकीत बांधकाम कालावधीसाठी बांधकाम समिती तयार करण्यात आली.
प्रत्यक्षात शाळा इमारतीचे बांधकाम सुरु केले तेव्हा ठेकेदाराचे कामगारांनी लाईन आऊट केला. ही बाब काही सुज्ञ ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित शाखा अभियंता यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यावेळी लाईन आऊट होऊन काम सुरु झाले आहे , हे त्यांनाही माहित नसल्याचे उघड झाले. परिणामी संबंधित शाखा अभियंता यांनी तातडीने कामाचे ठिकाणी भेट दिली व ठेकेदारास काम बंद ठेवण्याचे तोंडी निर्देश दिले.
कामाचा आराखडा प्राप्त झाल्यावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेकेदाराने काम सुरु करत असल्याचे बांधकाम समितीमधील सदस्यांना सुचित केले. त्यामुळे कामाच्या ठिकाणी ग्रामस्थही उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी अधिकारी आल्यानंतर ग्रामस्थांनी कामाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व सविस्तर चर्चा केली. चर्चेमध्ये ठेकेदार मनमानी करत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी यांनी यापुढे काम आराखडा व मंजूर अंदाजपत्रकातील तरतूदी प्रमाणे करुन घेण्यात येईल व प्रत्येक टप्प्यावर आमची देखरेख असेल , असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यामुळे ठेकेदाराने काम चालु ठेवले. याच दरम्यान ठेकेदाराने चौथऱ्यावर पी.सी.सी.चे काम केले. सदरचे पी. सी.सी.चे काम जोत्यावर केलेल्या माती भरावावरच केले असल्याचे काही ग्रामस्थांच्या पहाण्यात आले.
इमारतीच्या स्लॅबचे काम करण्यात आले त्यावेळी सदर कामाशी संबंधित शाखा अभियंता व कर्मचारी, ग्रा.पं. सदस्य, बांधकाम समितीतील सदस्य, ग्रामस्थ व ‘लोवले गावचे माजी सरपंच सिताराम तानू पडये हे सुध्दा उपस्थित होते. पी.सी.सी. चे काम भरावाचे मातीवरच करण्यात आलेले आहे. पी.सी. सी. खाली १० से.मी. जाडीचे काळ्या दगडाचे सोलींगची तरतूद अंदाजपत्रकात असून ठेकेदाराने ते काम केलेले नाही. ही बाब अधिकारी, ठेकेदार व ग्रामस्थ यांचे निदर्शनास माजी सरपंच यांनी आणून दिली . यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी ठेकेदारास विचारणा केल्यावर सदर दगडी सोलींगचे काम केले नसल्याची कबुली दिलेली आहे. यावर पी.सी.सी. तोडून दगडी सोलींग करुन घेण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर दिलेले आहे.
यावरुन इमारतीचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार व निविदेतील तरतूदीनुसार होत नसल्याचे आढळून येते. तसेच ठेकेदार व अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या कामातसुध्दा निविदेतील व अंदाजपत्रकात अंतर्भूत असलेल्या काही बाबी केलेल्या नसाव्यात असे ग्रामस्थांचे मत आहे. इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी याव्दारे इमारतीचे काम मंजूर अंदाजपत्रकाप्रमाणे व मंजूर निविदेतील तरतुदीनुसार व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. प्रस्तुत विषयांवर वस्तुस्थितीची पडताळणी करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी माजी सरपंच सीताराम पडये रामचंद्र पडये यांनी केली आहे.