( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
प्लास्टीक निर्मुलनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक पाऊल टाकले असून नाचणे (ता. रत्नागिरी) येथे प्लास्टीक कचर्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीमधून दिवसाला सुमारे तिन टन कचरा संकलित केला जाणार आहे. त्यातील दिड टनाहून अधिक प्लास्टीकवर प्रक्रिया करुन तो खासगी कंपनीला दिला जाईल. यामधून कचरा संकलित करणार्यांसह प्रक्रिया प्रकल्प असलेल्या ग्रामपंचातीला उत्पन्न मिळणार आहे.
केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन व गोबरधन याला महत्व दिले आहे. प्लास्टिक व्यवस्थापनासाठी जिल्हयात तालुकानिहाय आराखडा बनविला असून रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तालुक्याचा भौगोलीक विस्तार जास्त असल्यामुळे मोठ्या व सधन ग्रामपंचायतीच्या जवळील ग्रामपंचायतीचे मिळुन एक क्लस्टर अशी दहा क्लस्टर बनविली आहेत. प्रकल्पासाठीची जागा निश्चित झाली असून त्याला २४ लाख ९५ हजार ९१७ रुपये स्वच्छता अभियानातून मंजुर झाले आहेत. या निधीतून कचरा प्रक्रियेसाठी आणि वर्गिकरणासाठी अशा दोन शेड उभारल्या जातील. बेलींग, क्रशर, डस्ट रिमुव्हर ही मशिन घेतली जाणार आहे. दिवसाला सरासरी तिन टन प्लास्टीक कचरा गोळा होईल असा अंदाज आहे. त्यातील १६०० किलो कचरा प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल. प्रक्रिया केलेला कचरा विक्रितून महिन्याला सुमारे ६ लाख ७२ हजार रुपये ग्रामपंचायतीली मिळतील. त्यातील सुमारे ५ लाख ७२ हजार रुपये खर्च होतील. हा आठ मजूर, वीजबिल, आरोग्यविषय साहित्य, कचरा विकत घेण्यावर खर्च होतील. सुमारे ९८ हजार रुपये उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळेल. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षाला सुमारे सव्वा अकरा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. अन्य ग्रामपंचायतीकडून येणार्या कचर्यासाठी किलोला 8 रुपये दिले जाणार आहेत. यावर ३ लाख ८४ हजार रुपये खर्च होतील. या प्रकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय तर कार्यकारी अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पदवीधर शिक्षक आमदार निवडणुक सुरु असल्यामुळे निविदा प्रक्रिया राबविली गेलेली नाही.
अशी प्रक्रिया केली जाणार
९४ ग्रामपंचायतीमधून कचरा संकलित केल्यानंतर वर्गिकरण केले जाईल. बाटल्या, खुर्च्या, मोठ्या वस्तू बाजूला काढून प्लास्टीक पिशव्या किंवा पातळ वस्तू प्रक्रियेसाठी घेण्यात येतील. पातळ प्लास्टीक प्रेस करुन त्याचे आकारमान कमी केले जाईल. त्याचे गठ्ठे बांधून ते कच्चा माल म्हणून कंपनीला पाठविले जातील. दिवसाला दिड टनाहून अधिक प्लास्टीकवर प्रक्रिया होईल. मोठ्या वस्तू थेट कंपन्यांना दिल्या जाणार आहेत.