[ चिपळूण/ तालुका प्रतिनिधी ]
गैरप्रकार आढल्यास होणार कारवाई शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या शालेय यंत्रणा पोषण आहाराची आता भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार असून, हे भरारी पथक अचानक शाळेला भेट देऊन शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी होते का, याची पाहणी करणार आहे.
ज्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत, त्या शाळांमध्ये योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात येईल. मात्र, योजना राबविताना गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे,आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे आदी स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत. त्यामुळे शासनाने भरारी पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेमधील अधिकारी आणि दोन कर्मचारी यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. पथकामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची तपासणी करण्यात येणार आहे. शाळा तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिन्याला १० शाळांची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात येईल. भरारी पथकास शाळा तपासणी करताना आढळून आलेल्या बाबी, भरारी पथकाच्या प्रमुखाने तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे.