(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील कलाध्यापकांनी आपल्या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आजवर कलाविषयक अनेक उपक्रम राबविले . यावर्षी जिंदाल कंपनीच्या सहयोगातून घेतलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत साडेतीन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हा एक मोठा कलाविष्कार होता . बालकलाकारांकडे असणारे वेगळेपण ओळखण्यासाठी नावीन्यपूर्ण वस्तू तयार करणे या नव्या उपक्रमाने तर , विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळाला . या उपक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटनेचे कौतूक करावे तेवढे थोडे आहे . याच्या जोडीला जिंदाल कंपनीने कलाविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी जो सहकार्याचा हात दिला त्यासाठी जिंदाल कंपनीचे मी अभिनंदन करतो असे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ आणि जिंदाल कंपनी जयगड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिंदाल कंपनीच्या सभागृहात रविवारी ( दि . १५ रोजी ) संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र गावंड हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिंदालचे हेड पेदान्ना , सी आर झेड प्रमुख अनिल ददीच , कलाध्यापक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले . यावेळी बोलताना कंपनीचे हेड पेदान्ना म्हणाले की , जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून आपण भारावून गेलो . बालकलाकार किती बारकाईने आणि चौफेरे विचार करु शकतात हे त्यांच्या कलाकृतीतून दिसून आले . साडेतीन हजार पेक्षा अधिक कलाकृती आणि १६० पेक्षा अधिक हस्तकलेच्या वस्तू विद्यार्थ्यांनी तयार करुन जो उत्सफुर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल कंपनीला नक्कीच अभिमान वाटत आहे . कला विषयासाठी जिंदाल कंपनी यापुढेही शक्य असणारे सहकार्य करेल असे आश्वासन पेदान्ना यांनी दिले.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी पारितोषिक प्राप्त कलाकृती आणि हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन पाहिले आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कौतूक केले . रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटनेच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा यावेळी उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला . जयगडला येण्यासाठी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी जिंदाल कंपनीने विशेष बसची व्यवस्था केली होती . पारितोषिक प्राप्त चित्रांसह , उत्तेजनार्थ , विशेष कलाकृती आणि हस्तकलेच्या वस्तूंचे लवकरच रत्नागिरी येथे कलारसिकांसाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा कलाध्यापक संघटने तर्फे यावेळी जाहिर करण्यात आले . जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या जिंदाल कंपनीसह , उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड , माध्यमिक शिक्षण विभाग , सर्व शाळांचे मुख्याध्यापक , रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघ , सर्व कलाशिक्षक , पालक यासर्वांचे संघाचे विभागीय अध्यक्ष बबन तिवडे , सल्लागार तुकाराम दरवजकर , जिल्हाध्यक्ष इम्तियाज शेख , सचिव राजन आयरे यांनी आभार मानले आहेत.