रत्नागिरीः जिल्हाधिकारी यांच्या सह जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत लोकशाही दिनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून थातूरमातूर उत्तरे देत आजचा लोकशाही दिन उरकण्यात आल्याचे जनजागृतीचे केशव भट आणि समविचारीचे प्रमुख बाबा ढोल्ये यांनी सांगितले.
एनवेळी दृकश्राव्य पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लोकशाही दिन जाहीर करण्यात आला. पण या महत्त्वाच्या दिनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी हजर न राहता नागरिकांनी सादर केलेल्या समस्यांचे निराकरण योग्य त्या संबंधित कार्यालयाकडून न करता तक्रार कर्त्यांच्या निवेदनाला वाटाळ्याच्या अक्षता लावण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र समविचारी मंचचे बाबा ढोल्ये आणि जन जागृती संघाचे केशव भट यांनी केला.
लोकशाही दिन घेण्यात येणार असल्याची माहिती ऐनवेळी देण्यात आली तरीही जिल्हा प्रशासनाला आपल्या समस्या पूर्व नियोजित कळाव्यात म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ई-मेल द्वारे दाखल करण्यात आल्याचे या संघटना प्रमुखांनी सांगितले.
जनतेच्या वतीने उपस्थित केलेल्या प्रश्नात प्राधान्याने समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी रत्नागिरी बसस्थानकाचे रेंगाळलेले बांधकाम,आणि आँक्सिजन,फायर,इलेक्ट्रिकल आँडिट अहवालाबाबत मागणी केली तर जनजागृती संघाचे केशवजी भट यांनी रत्नागिरी शहरातील पार्कीग व्यवस्था विशेषतः टिळक आळी,रामनाका,आठवडा बाजार,गोखले नाका, समविचारी जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांनी शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरु करण्याबाबत,संगमेश्वर समविचारी तालुकाध्यक्ष यांनी रत्नागिरी देवरुख व्हाया पांगरी मार्ग रस्त्याच्या दुरावस्थेबाबत,यासह अन्य दोन विषय तर समविचारी युवा कोकण प्रमुख राजाराम गावडे यांनी समाजातील घरगुती महिला कामगार सह किराणा दुकानात काम करणारे घरोघरी माल देणारे यांना प्राधान्याने लसीकरण करावे,युवा प्रमुख निलेश आखाडे यांनी लसीकरणात 75 वर्षावरीलांना ताठकळत न ठेवता आँफलाईन लसीकरण करावे,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी कोव्हिशिल्ड पहिला डोस घेतलेल्या ज्या नागरिकांची नावे रजिस्टर नाहीत ती करावी ओमकार फडके यांनी शहरासह ग्रामीण रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न तसेच रिफायनरी संदर्भात जनतेच्या मागणीचा रेटा वरिष्ठ पातळीवर का दिला जात नाही अशी विचारणारा प्रमोद खेडेकर यांनी केली यासह इतर अनेकविध प्रश्न आजच्या लोकशाही दिनात सादर केले होते.अन्य विषयात तन्मय पटवर्धन,मयुर नाईक,अँड. सोनाली जैन,सचिन रायकर,नितिन मोने,विनय देसाई,संदेश मायनाक,प्रवीण नागवेकर,जगदीश अपकारे,आविष्कार नांदगावकर,अमृत गोरे,या समविचारींनी सहभाग घेतला होता.
जनजागृती संघाचे केशव भट यांनी अधिक माहिती देताना सांगितले की,सर्व निवेदन कर्त्यांनी आगाऊ ईमेल करुन सदर विषय कोणत्या खात्याशी संबंधित आहे आणि त्या खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्यांकडून उत्तर अपेक्षित आहे.याचा स्पष्ट उल्लेख असूनही सरसकट संबंधित खात्याकडून उत्तर घेऊन कळविले जाईल हे ठोकळेबाज उत्तर दिले जात होते.असे सांगून नगर पालिका मुख्याधिकारी हजर नसणे ही बाब गंभीर असल्याचे सांगितले.झूम मिटींगला हजर राहून आपला कँमेरा बंद ठेवणारे अधिकारी हे संतापजनक असल्याचे स्पष्ट केले.
समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये यांनी आजच्या लोकशाही दिनाबद्दल आपण कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
सादर केलेल्या निवेदनावर विषय कोणत्या विभागाशी सलग्न आहे.यासह अद्ययावत मसुदा बनविण्यासाठी अँड.सूरज मोरे यांनी मार्गदर्शन केले.