(मालवण)
तोंडवळी येथे खवले मांजर जाळ्यात अडकल्याची माहिती मिळताच वन विभाग कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात त्याची जाळ्यातून सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडले.
तोंडवळी येथे हॉटेल नित्यानंद या ठिकाणी खवले मांजर जाळ्यात अडकल्याची माहिती हिरेन्द्र घाडी यांनी वन विभागाचे वन अधिकारी श्रीकृष्ण परीट यांना दिली. परीट यांनी वनकर्मचारी अमोल परब यांच्यासह तत्काळ घटनास्थळी जाऊन ग्रामस्थ हितेंद्र घाडी, सिझर फर्नांडीस, राजन तोंडवळकर, भास्कर पडवळ आदींच्या मदतीने खवले मांजरास सुरक्षितरित्या पकडून ताब्यात घेतले.
वन विभागाचे उपवनसंरक्षक रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजराची तपासणी मालवण पशुधन विकास अधिकारी डॉ. दळवी यांनी केली. त्यानंतर खवले मांजरास सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. खवले मांजर हे जैवविविधता परिसंस्थेतील प्रमुख घटक आहे. तो सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललेला प्राणी असल्यामुळे त्याला १९७२ च्या कायद्याने संरक्षित केले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.