(रत्नागिरी)
सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशनच्या (२ ड) अध्यक्षपदी सीए भूषण मुळ्ये यांची निवड झाली. त्यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ हॉटेल व्यंकटेश येथे नुकताच झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले की, जनसेवा हीच इश्वरसेवा आहे. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे विविध समाजोपयोगी कार्यक्रम, उपक्रम कौतुकास्पद आहेत. तसेच येथे शपथ व पदग्रहण सोहळ्यात हात जोडून शपथ घेतली जाते म्हणजे भारतीय संस्कृतीनुसारच कामकाज चालते याचा आनंद वाटला. जायंट्स ग्रुप कांदळवन लागवडीसाठी प्रयत्न करत आहे, ही सर्वांत उत्तम व निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे.
या वेळी फाउंडेशनचे स्पेशल कमिटी मेंबर डॉ. मिलिंद सावंत, माजी अध्यक्ष विनायक राऊत आणि संजय पाटणकर, कार्यवाह राजेश गांगण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली.
नूतन अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांनी सांगितले की, जायंट्स ग्रुपतर्फे समाजात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. कार्यक्रमांची संख्या वाढवताना ग्रुपची सदस्य संख्याही वाढवली जाणार आहे. ग्रुपच्या नवीन शाखा पुढील वर्षभरात वाढण्याकरिता विशेष मेहनत घेणार आहे. डॉ. मिलिंद सावंत यांनी सांगितले की, कोरोना काळामुळे ग्रुपचे काम थांबले होते. आता नव्याने पुन्हा उपक्रम सुरू होत आहेत. रत्नागिरीत महिलांसाठी प्रसाधनगृहांची कमतरता आहे. याकरिता ग्रुपच्या माध्यमातून प्रसाधनगृह उभारणीसाठी प्रयत्न आहे. माजी अध्यक्ष विनायक राऊत व संजय पाटणकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन नव्या उपक्रमांकरिता सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी गेली १८ वर्षे कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कलाविषयक अनेक कार्यक्रम संस्थेने राबवले आहेत. जायंट्स या इंग्रजी शब्दांच्या अद्याक्षरापासून बनलेल्या उदारता, एकात्मता, क्रियाशीलता, सभ्यता, सत्यता, सेवा या सर्व वैशिष्ट्यांनी ग्रुप कार्यरत आहे. याप्रसंगी जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी, कारवांचीवाडी, संगमेश्वर आणि काजिरभाटी तसेच सिटी सहेली, मनकर्णिका सहेली, कुवारबाव सहेली, कारवांचीवाडी सहेली या ग्रुपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा झाला. युनिट संचालक सौ. प्रतिभा प्रभुदेसाई व सौ. पूनम नाळकर यांच्या अधिपत्याखाली शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन सौ. अनुया बाम यांनी केले.