(रत्नागिरी)
जाधव फिटनेस अकॅडमीच्या अध्यक्ष पदी भैय्याशेठ ऊर्फ किरण सामंत यांची, तर निमेश नायर यांची सदस्य पदी सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी भैय्या सांमत यांनी ॲकेडमीला सदिच्छा भेट देत ॲकेडमी करत असलेले उपक्रम व सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली. ॲकेडमीला कार्यतत्पर व सामाजिक प्रश्नांची जाण असणारे अध्यक्ष मिळाल्यामुळे आता जाधव ॲकेडमी अधिक जोमात कार्यरत होणार आहे. ॲकेडमीचे सर्वेसर्वा हेमंत जाधव यांनी भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अतिभव्य स्वरुपात राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा व मोफत धार्मिक सहलीचे नियोजन समोर ठेवले असल्याचे या कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
भविष्यामध्ये जाधव ॲकेडमीला भैय्याशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम करायचे असल्याचे श्री. हेमंत जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये आर्थिकदुष्टया मागासलेल्या मुलांसाठी मोफत इग्रजी मिडीयम शाळा, ऑलिंपिक लेव्हलच्या वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा होतील असे क्रिडा संकुल उभारणे, भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांसाठी काही योजना आणून त्यांना शक्य तितक्या आर्थिक दारिद्र्यातून बाहेर काढणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राथमिक स्वरुपाची मदत चालू करणे, शासकीय योजनेमध्ये न बसणारी कामे भैय्याशेठ सामंत व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून आपल्या संस्थेमार्फत पूर्णत्वास नेणे आदी विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचा मानस श्री जाधव यांनी बोलताना व्यक्त केला.
या प्रसंगी शालेय मुलांच्या हस्ते वार्डमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा मंडळाच्या कार्यकर्त्या संध्या सावंत यांनी केले. तसेच यावेळी ॲकेडमीचे जेष्ठ सभासद भैय्या वणजु तसेच हेमंत जाधव यांच्या हस्ते संस्थेचे नूतन अध्यक्ष भैय्याशेठ सामंत यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ॲकेडमीचे विद्यार्थी व वॉर्ड क्र.१ व २ चे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.