(लंडन)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरले. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा २०९ धावांनी विराट पराभव केला. दुस-या डावात ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव २३४ धावांवर आटोपला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या. त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपले नाव कोरण्यात अपयश आले. सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर भारताला सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी रचलेल्या ८६ धावांच्या भागिदारीने भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडने विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद १७९ अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कने अजिंक्य रहाणेला माघारी धाडले. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव २३४ धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाचा १० वर्षांपासून आयसीसी चषक विजयाचा दुष्काळ कायम आहे. यामुळे अनेक क्रीडा प्रेमींचे स्वप्नही भंगले.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने या पराभवाचे खापर गोलंदाज आणि फलंदाजांच्या खराब शॉट सिलेक्शनवर फोडले आहे. दोन महिन्यांच्या आयपीएलनंतर अवघ्या आठवड्याभरात भारतीय संघ हा अंतिम सामना खेळला. यालाही रोहितने पराभवाचे कारण मानले. WTC फायनलच्या तयारीसाठी किमान २०-२५ दिवस तरी हवेत, असे तो म्हणाला.
या WTC फायनलच्या भारतीय खेळाडूंनी दोन महिने IPL खेळले. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय खेळाडू लंडनला रवाना झाले. डब्ल्यूटीसी फायनल आयपीएलच्या एका आठवड्यानंतर म्हणजेच ७ जूनपासून येथे खेळवली जाणार होती. अशा परिस्थितीत दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर खेळाडूंना विश्रांती मिळाली नाही आणि आठवडाभरानंतर त्यांना ५ दिवसांचा कसोटी सामना खेळावा लागला. खेळाडूंसाठी हे खूप कठीण गेले असावे. त्याचाही त्यांच्या कामगिरीवर परिणाम होणे स्वाभाविक आहे.
यावर रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘एवढ्या मोठ्या फायनलपूर्वी तयारीसाठी तुम्हाला किमान २०-२५ दिवस हवे असतात. विशेष म्हणजे WTC फायनलपूर्वी भारतीय संघाने एकही सराव सामना खेळला नव्हता.