(नवी दिल्ली)
गेली साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. कोविड 19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या याबाबतच्या आपात्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, काल आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यामध्ये, कोविड-19 ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले.
डब्ल्यूएचओने सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा इतका मोठा परिणाम झाला की शाळा ते कार्यालय बंद राहिले. या काळात बरेच लोक तणाव आणि चिंतेतून गेले. त्यातून जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.