(नवी दिल्ली)
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी केंद्र सरकारने १०६ जणांना पद्म नागरी पुरस्कार घोषित केले. यामध्ये महाराष्ट्रातून प्रख्यात तबला वादक जाकीर हुसैन यांच्यासह ६ जणांना पद्मविभूषण तर उद्योजक कुमार मंगलम बिर्ला, गायिका सुमन कल्याणपूर यांच्यासह ९ जणांना पद्मभूषण आणि राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), प्रभाकर मांडे, भिकू इदाते, रमेश पतंगे, रविना टंडन, परशुराम खुणे यांच्यासह ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान, राज्यातील १२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारने १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये प्रसिद्ध तबलापटू जाकिर हुसेन, एस. एम. कृष्णा, श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषण, तर सपा नेते मुलायमसिंग यादव, ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस, बालकृष्ण दोशी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. पश्चिम बंगालचे माजी डॉ. महालानबीस यांना ओआरएसच्या शोधाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.
यासोबतच प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, सुधा मूर्ती, सुमन कल्याणपूर, कपिल कपूर, दीपक धार, एस. एल. भैरप्पा, वनी जयराम, कमलेश पटेल, स्वामी चिन्ना जियर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. तर महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, गजानन माने, रमेश पतंगे, कुमी वाडिया, रविना टंडन यांच्यासह प्रेमजित बरिया, मुनीश्वर चद्दावार, हेमंत चौहान, सुभद्रादेवी, हेमचंद्र गोस्वामी, राधाचरण गुप्तांबरोबरच एकूण ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकारण परशुराम खुने यांचे रंगभूमी क्षेत्रातील योगदान मोठे असून, त्यांनी आतापर्यंत ८०० हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. परशुराम खुणे यांनी अनेक नक्षलवादी तरुणांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. हा पुरस्कार म्हणजे गेल्या ५० वर्षाच्या कामाचे फलित असून हा पुरस्कार झाडीपट्टी रंगभूमीच्या रसिकांना अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया परशुराम खुणे यांनी दिली.
महाराष्ट्रातील १२ मानकरी
पद्मविभूषण : तबलावादक जाकीर हुसेन
पद्मभूषण : सुमन कल्याणपूर (कला), कुमार मंगलम बिर्ला (उद्योग), दीपक धर (विज्ञान-अभियांत्रिकी), सुधा मूर्ती
पद्मश्री : राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, गजानन माने, रमेश पतंगे, परशुराम खुणे, रविना टंडन