(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी येथे सोमवार दि. २६ डिसेंबरपासून तीन दिवसीय शालेय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ होणार असून या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते होणार आहे. क्रीडा महोत्सवात मुला- मुलींचे सांघिक खेळात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल तसेच मैदानी खेळांचाही समावेश आहे. यावेळी हस्तकला, चित्रकला, रांगोळी स्पर्धा व पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी दु्. १२ वाजता शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. विद्यार्थ्यांनी आवडीने आपापल्या संकल्पनेतून वर्ग सजावट व रंगरंगोटी प्रदर्शित केली आहे. मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या प्रेरणेतून व वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर कलाकृती साकारल्या आहेत. क्रीडा महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी,हितचिंतक उपस्थित राहणार आहेत, तरी या सर्व वार्षिक कार्यक्रमांना क्रीडाप्रेमी व कलाप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी केले आहे.