(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयासाठी क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून नवीन तयार करण्यात आलेल्या शालेय क्रीडांगणाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील (वेट लिप्टींग) खेळाडू विजय शिंदे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर ,संचालक किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, प्रतिक देसाई, संकेत देसाई ,प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे , पर्यवेक्षक शाम महाकाळ, माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम, क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, क्रीडा शिक्षिका मनिषा धोंगडे, किशोर नलवडे ,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार ,बंटी सुर्वे आदी उपस्थित होते .
जाकादेवी येथील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना खेळाच्या क्रीडांगणाची चांगल्याप्रकारे सुविधा नव्हती. खडकाळ भागातच मैदान तयार करून खेळ खेळविले जात असत. मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील विद्यालयातर्फे शालेय क्रीडांगण तयार करण्यासाठी क्रीडा अनुदान मिळावे, यासाठी क्रीडाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासासाठी अंगभूत गरज ओळखून रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि तरूण तडफदार क्रीडाधिकारी विजय शिंदे , तसेच मार्गदर्शन क्रीडाधिकारी सचिन मांडवकर यांच्या माध्यमातून क्रीडांगण विकास योजनेतून जाकादेवी विद्यालयाला सुमारे ७ लाख मंजूर करून त्यापैकी ५ लाख २५ हजार रुपयांचा पहिला टप्पा दिल्याने हे क्रीडांगण पूर्णत्वास गेले आहे. उर्वरित अनुदानाचा टप्पा लवकरच प्राप्त होणार आहे.
वेट लिप्टींग या क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य संपादन केलेले प्रख्यात खेळाडू तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडांगणाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खेळाचे महत्व सांगताना म्हणाले की, आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय खेळामध्ये प्राविण्य संपादन केल्यामुळे मी अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकलो ,आपणही क्रीडा स्पर्धांमधून जिद्द आणि आत्मविश्वासाने उज्वल हे संपादन करून आपणही खेळातून करिअर निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करा, मोबाईलचा अतिरेक टाळूनआपले मन अभ्यास आणि खेळाकडे केंद्रीत करण्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी शालेय भौतिक गरजांसाठी शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असल्याचे सांगितले. अशा योजनांचा लाभ घेण्याचेही आवाहन त्यांनी आवर्जून केले.शाळा व शिक्षण संस्थेने माझा आदरपूर्वक सत्कार केला, त्याबद्दल क्रीडाधिकारी विजय शिंदे यांनी शिक्षण संस्थेला धन्यवाद दिले. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर होते. बंधू मयेकर यांनी क्रीडाअधिकारी विजय शिंदे यांच्या कार्यशैलीचे खास कौतुक केले. समाधान व्यक्त केले. दिलेल्या अनुदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे मनापासून आभार मानले. या प्रसंगाचे औचित्य साधून शिक्षण संस्था व विद्यालयातर्फे विजय शिंदे यांचा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बंधू मयेकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सत्कार केला.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव वाघमारे यांनी, सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी तर आभार पर्यवेक्षक शाम महाकाळ यांनी मानले.