(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे बुधवार 21 रोजी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास मॅक्सिमो आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणी मॅक्सिमो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन अल्ताफ दाभोळकर (पडवे, गुहागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मॅक्सिमो चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन दाभोळकर हा आपल्या ताब्यातील मॅक्सिमो घेवून जाकादेवी ते भातगाव रस्त्याने वेगाने जात होता. त्याचवेळी भातगाव ते जाकादेवी अशा जाणार्या रिक्षाला मॅक्सिमो चालकाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की रिक्षाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली. प्रकाश सखाराम कुळये (35, खालगाव, जाकादेवी) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
मॅक्सिमो गाडीचा वेगच एवढा होता की, गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर जावून अडकली. यामध्ये मॅक्सिमोचेही मोठे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद चंद्रकांत साळवी (51, जाकादेवी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार मॅक्सिमो चालक दाभोळकर याच्यावर भादविकलम 279, 337, 338, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शिवगण करत आहेत.