(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षे वयोगटाखालील मुलींच्या कबड्डी संघाची खेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जाकादेवी हायस्कूलच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरावरती अंतिम विजेतेपद पटकावले. रत्नागिरीतील मातब्बर असलेल्या चार संघांवरती जाकादेवी मुलींच्या संघाने मोठ्या फरकाने विजय संपादन करून आपले वर्चस्व अबाधित राखले. या संघातून संस्कृती निंबरे, दिव्या वेलोंडे, सेजल कुळ्ये यांसह
संघातील सर्वच खेळाडूंनी आक्रमक चढाई व मजबूत पकडीच्या जोरावर संघाला विजेतेपद पटकावून दिले. या संघाला उपक्रमशील क्रीडाशिक्षक संतोष सनगरे, क्रीडाशिक्षिका सौ.मनिषा धोंगडे योगेश चव्हाण,सौ. वैष्णवी साळुंके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या तालुकास्तरीय विजयी संघाला प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांची प्रेरणा मिळाली. या संघाची जिल्हास्तरावर निवड झाल्याने शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, सचिव विनायक राऊत, संचालक किशोर पाटील यांनी खास अभिनंदन करून टीमला शुभेच्छा दिल्या.