जाकादेवी/वार्ताहर:
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी बाजारपेठे नजिक रहिवासी असलेल्या दिपक अनंत रहाटे वय वर्ष १९ या तरुणाने आपल्या घरातच रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी निदर्शनास आली.
दिपक अनंत रहाटे या तरुणाचे तीन महिन्यापूर्वीच वडिलांचे निधन झाले होते. दिपक व त्याची आई घरात चांगल्याप्रकारे राहत होते. नेहमीप्रमाणे दिपकने शुक्रवारी रात्री आपल्या कुटुंबासमवेत जेवण केले. जेवण केल्यानंतर तो आपल्या रूममध्ये झोपायला गेला. सकाळी साडेपाच वाजता दिपकची आई दिपकच्या रूममध्ये गेली असता दिपकने गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिच्या लक्षात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबांवर फार मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. दिपक रहाटे या तरुणाचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याला अभिनय क्षेत्राची प्रचंड आवड होती. अनेक छोट्या-मोठ्या शॉर्ट फिल्ममधून त्यांनी आपली कला प्रदर्शित केली होती. दिपक हा सुस्वभावी व प्रेमळ असा युवक होता.खूप कष्टाळू होता. वडीलांच्या काजू व्यवसायात तो आवडीने मदत करत असे.
दिपक रहाटे या तरुणाने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य हे करत असून खालगाव बीट अंमलदार किशोर जोशी या तपास कामात मदत करत आहेत. दिपक रहाटे याच्या अकाली जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.