( जाकादेवी / संतोष पवार )
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथे उभारण्यात आलेला टॉवर हा कमी क्षमतेचा असल्यामुळे नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे दोन्ही टॉवर नादुरुस्त झाले आहे. परिणामी बीएसएनएल आणि आयडिया नेटवर्क अभावी ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. बीएसएनएल आणि आयडियाचे रिचार्ज मारून ग्राहकांना मोठ्या आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जाकादेवी खालगाव परिसरातील सुमारे २५ ते ३० गावांमध्ये आयडिया आणि बीएसएनएलला आठवडा उलटला तरी रेंज नसल्यामुळे आधुनिक काळात इंटरनेट अभावी संगणकीय कामे खोळंबली आहेत.
बँकांचे आर्थिक व्यवहार होण्यासाठी पुरेसे नेटवर्क नसल्यामुळे कामांना मर्यादा पडत आहेत. ऑनलाइन कामे सुद्धा रखडली आहेत. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांनी मारलेले रिचार्ज नेटवर्क अभावी फुकट जात आहेत. जग चंद्रावर गेले असतानाही खेडोपाड्यात साध्या नेटवर्कसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. संबंधित यंत्रणेचा टॉवर बंद होतो हे कंपनीला का कळू शकत नाही? आधुनिक काळात इंटरनेट महत्वाचे असताना अधिकारी वर्ग या बाबींकडे डोळेझाक का करत आहेत? कंपनीचे हित पहाच पण ग्राहकांची ससेहोलपट कधी थांबणार? जाकादेवी हे मध्यवर्ती मोठे केंद्र असून या टॉवर अंतर्गत २५ ते ३० गाव समाविष्ट आहेत. संबंध अधिकाऱ्यांनी तातडीने जाकादेवी येथील टॉवरची वस्तूस्थिती पाहून दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष द्यावे अथवा कमी क्षमतेचा असलेला टॉवर अपेक्षित क्षमतेचा करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी शेकडो ग्राहकांच्या वतीने खालगाव येथील विद्यमान सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते मधुकर उर्फ काका रामगडे, युवा नेते प्रतिक देसाई यांनी केली आहे.