( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख मधील क्रांती नगर येथील अपार्टमेंट मध्ये एक वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खुनानंतर देवरुख शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र हा खून कोणी केला ? का केला? कशासाठी केला? मारेकरी कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या तपासाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पोलीस यंत्रणा मात्र अद्यापही या खुनाच्या शोध घेण्यास अपयशी ठरली आहे. सर्व अंगांनी तपास चालू आहे असे समजते.
देवरुख क्रांतीनगर मधील शारदा दत्तात्रय संसारे या वृद्धेचा डोक्यात घाव घालुन टेरेस वरील पाण्याच्या टाकीत टाकून देत खून करण्यात आला होता. ही घटना सोमवार 31 ऑक्टोबर रोजी घडली. मंगळवार पासून तपास मोहीम जोरात सुरू आहे. श्वान पथक पाचारण करण्यात आले. मात्र हे श्वान अपार्टमेंट परिसरातच घुटमळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबरच ठसे तज्ञ , फॉरेन्सिक लॅबची व्हॅन आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक दिवसभर देवरूखात ठाण मांडून होते. दरम्यान या खून प्रकरणात बुधवारी पुन्हा पोलिस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी देवरुख पोलिसांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर बुधवारी दोन महिलांचे जाब जबाब नोंदवण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
याबाबत देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी सांगितले की, खुन्याच्या शोध सुरूच आहे. धागेदोरे मिळताच या प्रकरणाचा छडा लागेल. मात्र जवळच्या व्यक्तीने हा कट रचला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता पोलिस कोणाला ताब्यात घेणार याकडे लक्ष लागले आहे.